लिहायचे किडे "



         व्यक्तिगत पातळीवर स्वतःला प्रूव्ह करताना योग्य मार्ग सापडत नाही, यावेळी आपल्या आवडी निवडीही आपल्याला धड सांभाळता येत नाहीत, त्यावेळचं जीवन व्यतीत करत असताना मनाला किती हादरे बसत असतील हे तीच व्यक्ती समजू शकते जिने प्रत्यक्षात तसा अनुभव घेतला असेल. याच परिस्थितीतून जाणारा मी, काहीतरी नवीन करण्यासाठी अनेक अपुरे प्रयत्न झाले पण गाडी रुळावर काही आणता येत नव्हती. त्यातच एक दिवस व्हाट्सएपला मॅसेज आला, वाचताक्षणीच वाटलं की जावं इथे.


काय बरं होतं त्या मॅसेज मध्ये?

"रात्रीस खेळ चाले ३" या मालवणी मालिकेसाठी ऑडीशन घेण्यात येणार होती.
खरं तर मी काही कलाकार नाही, किंवा आजतागायत शाळेतून, कॉलेज मधून स्वतःला कधीही प्रमोट केलेलं नाही, अगदी छोटा मोठा रोल सुद्धा नाही. याला अपवाद म्हटलं तर एकदा आमच्या वाडीतील मराठी शाळेमध्ये शारदोत्सवानिमित्त एका नाटुकलीसाठी तालीम केली होती, पण काही व्यक्तींच्या अढीमुळे रंगमंचापर्यंत ते पोहोचलेच नाही. पण मित्रांच्या संगतीमध्ये छोटे, मोठे नाटुकले होत असतात, तीच आपली तालीम आणि तोच आपला रंगमंच. पण कधीतरी एकांकीका किंवा संगीत नाटकात काम करता यावं अशी कित्येक दिवसांपासूनची इच्छा मात्र आहे.

त्यादिवशी विचार केला थोडं धैर्य दाखवून अनुभव तरी घ्यायला काय हरकत आहे. परिणामांचा विचार केला तर चार लोकं हसतील एवढंच, त्यापलीकडे तर काही होणारं नव्हतं. म्हणून स्क्रिप्ट लिहावी असं ठरवलं. त्यानंतर दोन दिवस मनात वाक्ये तयार होत होती, आणि निमित्तास कारण सर्दी हा प्रकार प्रगटला, नाकातून आणि डोळ्यातून पाणी येत होतं, सर्दी आणि आळस या दोन कारणांमुळे ऑडिशनचा दिवस उजाडेपर्यंत काहीही केलं नव्हतं. ऑडिशन च्या दिवशीच दुपारी अस्सल मालवणी भाषेमध्ये चार वाक्ये लिहून काढली, ती पुढीलप्रमाणे...

सगळा येवस्थित चललला, .. .., , सगळा .... येवस्थित चललला, . एक सूक्ष्मजीव, .....
एक सूक्ष्मजीव चीनच्या उकिरड्यार जन्माक येवन तात्या इंचूसारखो विदाऊट तिकीट आमच्याच माणसांच्या छाताडातसून आमच्या देशात इलो. आणि सगळ्या जगाबरोबर आमच्या पण मानगुटेर हात थेयल्यान.

देश बंद पडलो, मानसा जाग्यार अडाकली, खावचे पिवचे वांदे झाले. बैलाच्या तोंडाक बानाचे जाबळे मानसाच्या तोंडाक बानाचे लागले.

मानसांच्या छाताडातसून आवाज येवक लागलो,.. एकच मंत्र .....
"ओम भग भ्रूगे भग्नि भागोदरी, भदमासे येओली ओम फट स्वा:हा", , माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर, मानसाचो आत्मो बाहेर जावन आमच्या मानसांच्या कुडीनी कोरोना रवाक लागलो.

शंभर, हजार, लाख, आकडे वाढत गेले, आणि एक एक जण आपली मान टाकुक लागलो.

त्यावक्तार आमच्या घुडात कोंबडी होती, रोग इलो काय एका कोंबड्याबरोबर सगळी कोंबडी लकाक लागत, आणि पुरो घुड रिकामी जाय, तीच अवस्था आज मानसांची झाली.



दोन वाजता सुरू होणाऱ्या ऑडिशनसाठी चारच्या सुमारास मी ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचलो ते कळसुलकर कॉलेजच्या हॉल मध्ये. जवळपास चार-पाचशे माणसांची वर्दळ पाहून अवाक झालो. उगाच घरी टाईमपास केला, लवकर यायला पाहिजे होतं असं वाटलं. आता कधी नंबर लागेल हा प्रश्न. तूर्तास ऑडिशनसाठी नाव नोंदणी करून ठेवू, ऑडिशन द्यायला मिळालं तर देऊ नाहीतर आल्या पाऊली परतीची वाट धरावी असं ठरवलं. योगानं लांबच्या स्पर्धकांसाठी एक व्हाट्सएप नंबर शेअर करून त्यावर आपला प्रोफाइल व्हिडीओ पाठवावा अशी अनाऊंसमेंट झाली आणि जमलेली गर्दी साधारणतः अर्ध्याने कमी झाली. जरा बरं वाटलं, त्याचक्षणी असही वाटलं की आपणही व्यवस्थित रिटेक घेऊन घरीच व्हीडिओ बनवून पाठवावा का? पण मनाचा दुसरा कोपरा यासाठी तयार नव्हता. याचं कारण तिथल्या स्टेजवर येणारी मजा, तिथला प्रेक्षक घरी मिळणार नव्हता, बिनधास्त स्टेजवर पाऊल टाकून एक नविन अनुभव घेता यावा, स्वतःमधील धैर्य वाढवावं, ऑडिशनचा तो फील अनुभवता यावा हेच.




लाईन मध्ये असतान वाक्ये आठवत होतो, म्हणजे मनातल्या मनात जणू तालीमच, जेव्हा नंबर लागला तेव्हा स्टेजवर पाऊल ठेवलं. कैमरामनने सूचना करताच स्वतःचं नाव, राहण्याचे ठिकाण आणि मोबाइल नंबर सांगितला. फ्रंट लुक, साइड लुक दाखवून ॲक्टिंगला सुरवात केली. मालवणी भाषेत लिहिलेली ती वाक्ये अचानक मराठी भाषेमध्ये कशी परावर्तित झाली काही कळलेच नाही. स्टेजवरुन खाली उतरताना मात्र आनंदानं भरगच्च भरलेली बॅग घेवून खाली उतरलो.

त्यादिवशी त्या ऑडीशनने मनाला दिलेला आनंद कमालीचा होता. प्रचंड भारी वाटत होतं, जणू काही आपण श्रीमंत झालो आहोत. त्या अनुभवातून आपण साधारण तरी ॲक्टिंग नक्कीच करू शकतो याची मात्र खात्री झाली. तसं टॅलेंट बिलेंट काही आपल्यात भरलेलं नाही म्हणा, पण आपला चेहरा मात्र पांडु, फँड्री किंवा दगडूच्या जवळपास जाणारा आहे हीच आपली जमेची बाजू. पण एकंदरीत पहिली ऑडिशन ..

... लय भारी वाटलं राव.. ...