कोंडूरा बीच

       त्यादिवशी किरणचा फोन आला, आज आपल्याला कोंडूरा बीच वर जायचं आहे, तो बोलला. कोंडूरा नावाचं बीच आहे असं माझ्या ऐकिवात होतं. पण मला माहीत असलेलं कोंडूरा गाव हे आरोस, दांडेली, मळेवाड,आरोंदा या पंचक्रोशितलं. तिथला समुद्र किनारा तो म्हणजे शिरोडा, मनात तो प्रश्न होता की, कोंडूरा गावाला तर समुद्र किनारा नाही, मग हे कोंडूरा नावाचं बीच नक्की आहे तरी कुठे? ते जाणून घेण्यासाठीच मी लगेच, किरणला येतो असं सांगून फोन ठेवला. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे थेट रवाना झालो ते वेंगुर्ल्याच्या दिशेने.
        वेंगुर्ल्यात पोहोचल्यानंतर तिथून दाभोली नाक्यावरून जसे पुढे गेलो तस तसा निसर्गाचा अलौकिक नजाराच पहायला मिळाला. एका बाजूला वर्षानुवर्षे सागराच्या अजस्त्र लाटा झेलून निर्ढावलेले हिरवेगार, काळ्या कातळानं वेढलेले मठ्ठ डोंगर, त्यामधील दऱ्यातून रेघा ओढीत खळाळत जाणारे ओहोळ आणि खालच्या बाजूला कुंभकरणा सारखा श्वास वर खाली करत घोरत पडलेला तो अथांग समुद्र. त्या डोंगरातील रस्त्यातुन पुढे पुढे जात आम्ही पोचलो कोंडुरावाडीत. या वाडीचं नाव कोंडुरावाडी म्हणून तो बीच कोंडुरा बीच. या बीच वर जाताना थोडी खबरदारी नक्की घ्यावी लागते ती म्हणजे रस्त्याची, डोंगर उताराचा तो रस्ता चालत जाण्याव्यतीरिक्त सुरक्षित नाही. खाली उतरताच मात्र डोळे दिपून जातात, जणू तुम्ही निसर्गाचा चमत्कारच पाहत आहात.


खडकाळ रस्त्याने पावलं टाकत, खाली उतरून, नदीवरील त्या इवल्याश्या झुलत्या पुलावरून आम्ही महेश दादाच्या घरी पोचलो. डोंगराच्या कड्यावर वसलेलं माडाच्या बनातलं त्याच ते घर. निसर्गाच्या भव्य गर्द वनराईतुन एकाच वेळी डोंगर, नदी आणि समुद्राचं ते चैतन्यमय रूपडं तो नेहमीच बघत आलाय. त्याच्या घरी वरण भातावर यथेच्छ ताव मारून आम्ही नारळीच्या बागेतून खाली उतरत समुद्राकडे निघालो. कोकणातील एखाद कौलारूं दुपाकी घर, दोन्ही पाकी दिसतील अशा बाजूने बघितल्यावर दिसणाऱ्या आकाराचं ते कोंडुरा बीच. अगदी तस्सच.
         खरं तर ऋतूमानानुसार कोंडुरा त्याच्या वेगवेगळ्या रूपात आपल्याला साद घालत असतो. डोंगराच्या मधून जांभ्या खडकावर मारा करीत वाहणाऱ्या नदीचं ते फेसाळत जाणारं गोडं पाणी क्षणार्धात सागराच्या स्पर्शाने खारं होऊन जातं. सागराच्या मिलनाने सागरमय होऊन जातं. पावसाळ्यात कोंडुऱ्याचं हे बीच अदृश्यावस्थेत असतं. वरच्या सड्यावरून त्या जांभ्या खडकावर दाणकन आपटण्याची भीती न बाळगता, न डगमगता येणारा नदीचा तो गोड्या पाण्याचा प्रवाह त्या बीचला जणू नागडं करून टाकतो. नदीचा प्रवाह तिथले जांभे दगड उघडे पाडतो, बीचवरील ती चंदेरी वाळू समुद्रात ढकलून देतो. पावसाळ्यात कोंडुरा बीच चा तो परिसर नदीच्या गोड्या पाण्याने झाकून जातो आणि त्या बीचला विलोभनीय असा वेगळाच नजारा प्राप्त करून देतो. बदलत्या ऋतुचक्राने जसजसा पाऊस उतरणीला लागतो आणि डोंगरातील पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागतो तसतसा समुद्र आपल्या लाटांनी पुन्हा त्या मोकळ्या बीचवर चंदेरी वाळूचा साज चढवतो, आणि नव्याने त्या बीचची निर्मिती करतो. ज्याप्रमाणे नदी, दरवर्षी नव्याने जन्म घेते त्याचप्रमाणे तो बीच ही नव्याने जन्म घेतो.



बीच च्या बाजूलाच तिथे एक पांडवकालीन मंदिरही आहे. बराच वेळ त्या सागराच्या लाटांसोबत आम्ही जलक्रीडा केल्या. अत्यंत सुरक्षित असा वाटणारा तो सागर किनारा भरपूर मौज देऊन गेला, त्यादिवशी कोंडुऱ्याबद्दल अजूनही काही गूढ गोष्टी ऐकण्यात आल्या, डोंगराच्या तुटलेल्या उंच कड्यामध्ये मोठठालं विवर असून ते खूपच लांबच्या लांब पसरलेलं आहे. त्याचवेळी आरती प्रभुंच्या कोंडुरा या कादंबरी बद्दलही कळलं, कोंडुऱ्या बद्दल च्या गुढ गोष्टी जाणून घेण्यासाठी मी ती वाचायचं ठरवलं.

 कोंडूरा पुस्तक

       आयुष्याला कंटाळून, त्रासून, स्वतःला सिद्ध करण्याच्या हेतूने घर सोडून निघालेला परशुराम तात्या, वाटेत एका अज्ञात जोगीच्या सांगण्यावरून माघारी फिरतो. घरी आल्यावर विष्णुदादा त्याचा लाखोल्या वाहून यथेच्छ सत्कारच करतो, वैचारिक पातळीवरील दोघांमधील मतभेद त्याला अजूनच अपमानित करण्यास मदत करतात. काहीतरी काम करण्याच्या हेतूने परशुराम तात्या घराच्या पाठीमागे विहीर खाणायला घेतो, अंधश्रद्धाना बळी पडून अजून दोन हात खणल्यावर मिळणारं पाणी मिळू नये म्हणून तेवीस हात खोल खणलेली विहीर अर्धवट अवस्थेत टाकतो. विष्णुदादा मात्र याच्या हाताला यशच नाही म्हणून परत त्याची अवहेलना करतो.

अगदी सहजपणे परशुराम तात्याचा महाराज होतो. सुरवातीला तो अज्ञात योगी, नंतर अंगात देवी येणारी सुतारिण तिच्या सानिध्यातुन कस्पटासमान असलेल्या परशुराम तात्याचा कधी तातोबा महाराज होतो त्याचं त्यालाही कळत नाही, अंगात भगवी कफनी, दंडात आणि मनगटात रुद्राक्षाच्या माळा. आरती प्रभूंची ही कादंबरी परशुराम तात्या, त्यांची बायको अनुसया, विष्णुदादा, त्यांची म्हातारी आई, सुतारिण, तिचा नवरा दादा सूतार, बुटक्या बाळी, जनार्दन भटजी, नारोबा, सोहोनी मास्तर, केलड्यासारखा दिसणारा वासु आणि त्याची सुंदर बायको पार्वती, अशा काही पात्रांभोवती फिरत शेवटी परशुराम तात्यांपर्यंत येऊन पोचते.

सामान्य असणाऱ्या परशुराम तात्याचं समाजातील स्थान शेवटी उंचावतं. स्वतः वैराग्य धारण केलेला तो महाराज कादंबरीच्या शेवटी मात्र स्वतःच्या शारिरीक गरजेवर ताबा ठेवू शकत नाही, अनुसयेचा बाईपणा तिच्याविरुद्ध तात्यांच्या आड येऊन तात्यांची विरक्ती नाहीशी झाली, त्याचा धसका घेऊन, त्या महंताचं अधःपतन करण्यास आपणच जबाबदार असल्याचं समजून तात्यांची बायको अनुसया झरा सडत पडलेल्या तेवीस हात खणलेल्या त्या मागच्या विहिरीत स्वतःला झोकून देते. अंधश्रद्धा, धर्माचा असणारा पगडा, थोतांड, पैशाचा हव्यास यामुळे तात्या समाजाच्या दृष्टीने देव पण स्वतःच्या नजरेत मात्र देवत्व असल्याचं त्याला कुठेच दिसत नव्हतं.

कादंबरी वाचताना, आपण काय वाचतोय आणि नक्की का वाचतोय हा प्रश्नही मनाला शिवुन गेला, पण परशुराम तात्याभोवती खिळवून ठेवणारी ती कादंबरी सुरवातीला वचल्यानंतर शेवट पर्यंत वाचाविशीच वाटते. भाषा सरळ सोपी, त्या सोप्या भाषेतुनही कादंबरीतील प्रसंग जणु उभे ठाकतात. मला ही कादंबरी वाचताना, आरती प्रभुनी कही ठिकाणी दिलेली विशेषणे, दिलेल्या उपमा, शब्दातुन भासवलेलं व्यक्तिचित्रण विशेषकरून आवडलं. त्यासाठी आरती प्रभुंना कायम वाचत रहावं असं मनोमन वाटलं.

खरं तर कोंडूरा वाचण्यामागचं कारण म्हणजे कोंडुऱ्याच्या इतिहासाबद्दल, नैसर्गिकतेबद्दल, भौगोलिकतेबद्दल अजून माहिती मिळावी, डोंगराच्या गर्भात असणाऱ्या त्या विवराबद्दल अधिक जाणून घेता यावं, कदाचित आरती प्रभुंनी कोंडुऱ्याचं वर्णन केलं असतं तर त्यांच्या नजरेतून कोंडुरा पुनश्च पाहता यावा, यासाठी कोंडुरा वाचण्याचा तो अट्टहास. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. फक्त कादंबरीच्या सुरवातीला " डोंगराचा एक तुटलेला कडा दोन चार उंच माडांएवढा उभा असून त्याच्या पायाशी केवढं तरी विवर आहे, त्यात घुसणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे निर्माण होणारा, आजूबाच्या वीस पंचवीस मैलात घुमणारा धो...धस असा कोंडुऱ्याचा आवाज. असा मोजका उल्लेख सोडला तर, कादंबरी रूढी, अंधश्रद्धा, देवस्की आणि परशुराम तात्या याभोवतीच फिरत राहते. त्याबाबतीत मात्र माझी थोडी निराशाच झाली.