महिना कुठला मला आठवत नाही, पण वर्ष २०११. घरात बहुधा माझ्या आई, आजोबांशिवाय कुणालाच माहिती नव्हतं. दुपारच्या वेळेस भर उन्हातून एक कापडी पिशवी आणि सायकल घेऊन मी निघालो. माझ्याच एका मित्राने एक पत्ता दिला होता, तिथे पोहोचलो. तिथुन परत  निघालो ते थेट घरी, सोबत नेलेल्या पिशवीत एक गुटगुटीत वजनाचं कुत्र्याचं पिल्लू घेऊन. बाबांना त्यावेळी असं कुत्री मांजरं पाळणं आवडत नव्हतं, त्यामुळे ते रागावतील याची भिती होती, पण आजोबांचा पक्ष माझ्या बाजूने होता त्यामुळे मी निर्धास्त होतो. त्या पिल्लाचं नामकरण "चिंटू" असं करण्यात आलं.

             
        त्यावेळी आमचं जुनं घर मोडकळीस आलेलं असल्याने जुन्या घराचा काही जीर्ण भाग आम्ही पाडलेला. त्यामुळे नवीन घर बांधेपर्यंत आम्ही, आमच्या नवीनच बांधलेल्या शेतघरात शिफ्ट झालेलो. आजोबा आणि मी रात्रीच्या वेळी जुन्या घरात झोपायला जायचो, तेव्हा हाही आमच्यासोबत असायचा. याला कॉटवर घेतलं की आनंदाने उड्या मारायचा. त्यावेळेस कॉलेजमध्ये असल्याने माझा जास्त वेळ चिंटूसोबतच. तोही मी घरातून त्याला न घेता बाहेर पडलो तर माझ्यासोबत यायला बघायचा. आमच्या नवीन घराचं काम चालू होतं, ती जागा थोडी जुन्या घरापासून लांब होती. याला तिकडेहीे घेऊन आम्ही जायचो. योगायोग असावा का अजून काही, माहीती नाही. पण याला घरी आणल्यापासून आमची परिस्थिती पण बदलत चालली होती. पुढे आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. फक्त प्लास्टर पुरतं घर पूर्ण झालेलं. दरवाजा नव्हता. खिडक्याही उघड्या होत्या. कुठे शेतात वैगेरे कामासाठी गेलो की याला दारात बांधून आम्ही जायचो, सुरवातीला हा एकटा असल्याने रडायचा. पण हा घरात असताना घराची पायरी चढणे कुणालाच शक्य नव्हतं. आणि तसंही हा एवढासा पण याच्या भुंकण्याचा आवाज एवढा मोठा असायचा की दूरवर देखील तो आम्हाला ऐकायला यायचा. व कळायचं की घरी कोणीतरी आलंय. खरं तर तो फक्त कुत्रा नव्हता, आमच्या घरचा एक सदस्यच बनला होता. याचं जेवणही आमच्याहून वेगळं नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही जे जे खायचो त्यामध्येच त्याचा वाटा असायचा. त्याला खायला, प्यायला घालण्याची जबाबदारी माझ्या आजोबांकडे होती. मुंबईमध्ये मी कामाला असताना गावी गेलो की मला बघून हा जाम खुश व्हायचा, नाचायचा, उड्या मारून हात चाटायचा. याला पेडिग्री घ्यायचो पण ती काही त्याला फारशी आवडली नाही. चिकन हाच त्याचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. चिंटू इकडे ये, हा यायचा. खाली बस, हा बसायचा. सारखा बस, हा नीट बसायचा. घरातून कोणीही बाहेर निघालं की हा मागे यायचा. कधी "येऊ नको घरी जा" असं म्हटलं की न रहावल्यासारखं हळू हळू मागे सरकायचा. एवढी सवय झालेली की आज याच्याशिवाय चैन पडत नाही. आठवण आली की डोळ्यात आसवं दाटतात. अलीकडेच गच्चीवर नवीन बांधकाम करून इलेक्ट्रिक फिटिंग करतेवेळी डोअर बेल साठी पॉईंट ठेवताना, फिटरला मी बोललेलो "तसंही आम्हाला डोअर बेल ची गरज नाही, कारण कोण आलं तर चिंटूमुळे खालीच आम्हाला कळतं" तेव्हा वाटलं पण नव्हतं की तू एवढ्या लवकर या जगाचा निरोप घेशील.




        त्यादिवशी लोणावळ्याहुन परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे तू माझ्यासाठी पुढे आला नाहीस, दिसलाच नाहीस. कदाचित तू ऐकत नसताना मी तुला मारायचो म्हणूनच मी नेमका लोणावळ्याला गेलो त्याच दिवशी तू अंतिम श्वास घेऊन मला तोंड न दाखवता या जगाचा निरोप घेतलास. तू भुंकत असताना गप्प रहा म्हणून सांगणारे आम्ही आज तुझ्या भुंकण्याला तरसतोय. आमचे सगे, सोयरे एका भेटीत तुला कळले. त्यांना तू भुंकलास तो एकदाच, त्यानंतर त्यांचं तू स्वागतच केलंस. पहिल्या भेटीतला पोटतिडकीतुन निघालेला तुझा "भों भों" आवाज नंतर "भुss भुss" अशा प्रेमळ स्वरात बदलला. पण तुझ्यासाठी त्रयस्थ असणाऱ्यांना तुझ्या भुंकण्याचा आकांड तांडव घर डोक्यावर घेतल्यासारखाच असायचा, म्हणूनच आज तू नसताना घरी आलेली लोकं तुझी चौकशी करतायेत. तू आमच्या घराची ओळखच बनलेलास. तू गेलास त्या रात्री घरच्याना तुझं भुंकणं नसतानाही झोप लागली नाही. आजोबा सकाळी रडायला लागले. मुंबईहुन येताना काका तुझ्यासाठी स्पेशल तुझं आवडतं मारी बिस्कीट आणायचा. तुही तो आला की तुझ्या पद्धतीनं तुझ्याच भाषेत त्याचं स्वागत करायचास, मग तो जाईपर्यंत त्याच्याच मागे मागे करायचास, त्यालाही तुझी वार्ता कळल्यानंतर रडणं आवरता आलं नाही. तुझी भाषा आणि आणि आमची भाषा वेगळी असली तरी, ती आम्हाला कळायची, आणि आमची तुला. तुझ्या अंगातली रग मात्र माझ्या समजण्यापलीकडची, तब्येत ठीक नसतानाही शेवटपर्यंत तुझ्या भुंकण्यात, गुरगुरण्यात फरक दिसला नाही. तू गेलास तरी, माझ्यासोबत नाचणारा तू, अनोळखी व्यक्तीवर गुरगुरत भुंकणारा तू, गळ्यात नवीन पट्टा घातला की खुश होणारा तू, आजोबांसोबत सकाळच्या कोवळ्या उन्हात सोबतीला जाऊन बसणारा तू, रात्रीच्या वेळी घरातलं कुणी अंगणात जाऊन बसलं तर त्याच्या सोबतीला जाऊन बसणारा तू, बाबांना संध्याकाळी घरी यायला उशीर झाला, तर ते आल्यावर घरात भुss भुss करत आईला सांगायला जाणारा तू, माझ्या नजरेच्या खाणा, खुणांवरून माझ्यासोबत खेळ करणारा तू, छु छु केल्यावर धावत जाणारा तू, छोट्यांच्या भांडणात तुझा आवाज मिक्स करणारा तू, घरात उशिरापर्यंत कोणी झोपून राहिलं, आणि तुला उठवायला सांगितलं तर मोठ्याने भुंकणारा तू, नजरेसमोरून जात नाहीस.



 तुझ्या जाण्यानंतर शेजारी, पाहुणे तुझी जागा घेण्यासाठी दुसरा कुत्रा आणायला सांगतायेत, तुझ्यासारखा दुसरा मिळणे कठीणच, पण चिंटू मी थांबलोय, वेड्या, भाबड्या आशेने, कदाचित तू, गेलास त्याच दिवशी कुठेतरी जन्म घेतला असशील, आणि लहान होऊन परत मला तू भेटशील आणि तेव्हा तुला मी घेऊन येईन. असंच मला वाटतं. पण तुझी आठवण मात्र मरेपर्यंत येत राहील. तुझ्यासोबतचा ९ वर्षाचा सहवास खूप कमी वाटू लागलाय आता.
      
भावपूर्ण श्रद्धांजली ..💐💐
  ०६-०३-२०२०.
      

वासुदेवाची ऐका वाणी