लिहायचे किडे "


        यंदाच्या वर्षाला सुरवातीलाच जानेवारी मध्ये एकाच महिन्यात दोन ट्रेक करता आले. पहिला ट्रेक केला तो स्वराज्याच्या राजधानीचा आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा अवसर पाहुन मनोहर मनसंतोष गडावर नाईट आउट केला तो दुसरा ट्रेक. त्यानंतर अवतरला कोरोनासूर, त्यामुळे मागच्या जवळपास नऊ, दहा महिन्यामध्ये एकही ट्रेक करता आला नाही, आणि या प्रदीर्घ कालावधीनंतर नियोजन केलं ते हनुमंत गड चढण्याचं.

सावंतवाडीपासून साधारणपणे तीस किलोमीटर वर निसर्गाच्या कुशीत वसलेलं फुकेरी गाव, या फुकेरी गावाचं अगदी टोकाचं ठिकाण म्हणजेच हनुमंत गड. या आधी मी फुकेरी येथे आमच्या एका प्रोजेक्टच्या वर्कआउट साठी गेलेलो, पण गड कधी चढलो नव्हतो. फुकेरी गावची नैसर्गिक संपन्नता आणि भौगोलिकता मी पहिली होती. हनुमंत गडा व्यतिरिक्त तिकडे जंगलामध्ये सात ठिकाणी रांजण खळगे असल्याचे माहित होते, त्यामुळे सकाळी हनुमंत गडाचा ट्रेक करावा आणि त्यानंतर दुर्गम भागात असलेल्या त्या रांजण खळग्याच्या विलोभनिय ठिकाणी दुपारचं जेवण करावं असा बेत आम्ही ठरवला होता. त्यानुसार ८ नोव्हेंबर चा दिवस निश्चित करण्यात आला होता, पण त्यावेळी घडलेल्या एका शोकाकुल घटनेमुळे हा ट्रेक पुढे ढकलण्यात आला. व त्यानुसार आमच्या सर्व सदस्यांच्या संमतीने २९ नोव्हेंबर या दिवशी हा ट्रेक करण्याचे निश्चित करण्यात आले.

ट्रेक च्या आदल्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबरला संध्याकाळी जेवणासाठी लागणारया सामानाची खरेदी व इतर सहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आमचा एक प्रसाद नावाचा सदस्य त्याने या अगोदर हनुमंत गडावर चढाई केली होती. त्यामुळे त्याच्याच ओळखित फुकेरी येथील आईर काका, काकुंकडे जेवण बनवण्यासाठी लागणारया भांडयाची आम्ही तजवीज करुन ठेवली होती.

हनुमंत गड 

दुसऱ्या दिवशी सकाळी लागणारं सर्व साहित्य घेवून सर्व सदस्य निश्चित ठिकाणी जमल्यावर साधारण साडे सात च्या सुमारास आम्ही फुकेरीच्या दिशेने निघालो. आमचे चार सदस्य अगोदरच फुकेरी येथील मंदिरात पोचले होते, साडे आठ च्या सुमारास आम्ही सर्वजण फुकेरी येथे पोहोचलो, तिथल्या मंदिरांमध्ये देवतांचा दर्शन घेऊन पोचलो ते आईर काकूंकडे, त्यांच्या कडून योग्य ती भांडी घेऊन साधारण नऊ च्या सुमारास आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव जी गर्जना करत गड चढण्यास सुरवात केली.



हनुमंत गडाचं क्षेत्रफळ जरी मोठं असलं तरी काही ठिकाणचा भाग वगळता चढाई सोपी व त्यासाठी लागणारा वेळही कमी आहे. तसेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले होते. अर्ध्या तासामध्ये आम्ही गडावर पोचलो. गडावर पोहोचल्यानंतर आम्ही सोबत नेलेली शिदोरी खाल्ली. काही ठिकाणची झाडं झुडूपं सोडली तर गड संबंध गवताळ कुरणाने आच्छादलेला होता. महाराजांचा एक पुतळा, बुरुज व गडावरील इमारतीचे नाममात्र अवशेष याव्यतिरिक्त गडावर फारसं काही नाही. गडावर दृष्टीस पडणाऱ्या मनमोहक ठिकाणी छायाचित्रे घेत आम्ही संपुर्ण गड फिरलो.

राजिंगण

दुपारच्या जेवणासाठी आम्हाला दुसऱ्या एका पॉईंट ला जायचे होते, त्या पॉईंट वर जाण्यासाठी गडावरूनच वाट असल्याचे कळल्याने मी आणि आमचा एक रोहित नावाचा सदस्य दोघेही वाट शोधत शोधत गडाच्या डाव्या साइड ने एका कड्यावर पोहोचलो, तिथून परत मागे येऊन दुसऱ्या बाजूने खाली चालत जाण्याचा प्रयत्न केला पण मध्येच वाट दिसेनाशी झाल्याने आम्ही माघारी परतलो. नंतर, गडावरून त्या पॉईंट वर जाण्यासाठी वाट न सापडल्याने सर्वानी गड उतार व्हावयाचे ठरविले, त्याप्रमाणे सर्व सदस्य आल्या वाटेने गडाच्या प्रवेशद्वारापाशी गडउतार होण्यास निघाले. त्याचवेळी मी आणि आमचा एक अजित नावाचा सदस्य गडाच्या दुसऱ्या बाजूने गडाचे निरीक्षण करत चालू लागलो. आम्ही गडाला विळखा घालून प्रवेशद्वारापाशी पोचलो तरी आमचे इतर सदस्य अजूनपर्यंत प्रवेशद्वारापाशी पोचले नव्हते. त्यांची वाट बघत न बसता आम्ही दोघेही वेगाने पावले टाकत गडउतार झालो आणि आईर काकुंच्या घरी पोहोचलोे, काकुंना झालेली फसगत सांगितली, आम्ही हनुमंत गड चढून उतरलो पण रांजण खळग्याचं ते ठिकाण काही सापडलं नाही. तसं त्या ठिकाणापर्यंत पोहोचणं आम्हाला वाटत होतं तेवढं सोपंही नव्हतं याची काकुंनाही कल्पना होती. त्यामुळे त्या स्वतः वाट दाखवण्यासाठी अमच्यासोबत त्या चढणीवरून चालू लागल्या, मागे राहिलेल्या आमच्या इतर सदस्यांना तशा सूचना मी दिल्या होत्या. काकू एका पॉइंटवरून जंगलातून सदर ठिकाणापर्यंत जाणारी वाट दाखवून माघारी परतल्या, त्यांच्या बोलण्यावरून सदर ठिकाणाचे नाव राजिंगण असून ते देवाचे स्थान असल्याचे आता मला कळले होते.

घनदाट जंगलात राजिंगणच्या शोधार्त केलेली पायपीट..

आमचे सर्व सदस्य गडउतार होऊन, साधारण दुपारी १२ च्या दरम्याने, सांगितल्याप्रमाणे माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. तिथुन मग सर्व एकत्रितपणे जंगलातून जाणाऱ्या त्या पायवाटेने काकूंनी सांगितल्याप्रमाणे इच्छित स्थळी जाण्यास निघालो. बराच वेळ चालल्यानंतर पुढे गावातील लोकांचे शेतमांगर (शेतघरं) आम्हाला दिसले. तिथून थोडं पुढे गेल्यावर बुचकळ्यात टाकणारया दोन वाटा आम्हाला लागल्या, आमच्या सर्व सदस्यांना त्या पॉईंट वर थांबायला सांगून मी आणि अजित दोन्ही मार्गाने चालत गेलो व पुढे एकत्र भेटलो. त्या दोन्ही वाटांचे पुढे एकाच पायवाटेत रूपांतर झाले होते. तसेच पुढे मी आणि अजित चालायला लागलो, पुढे आम्हाला एक छोटा ओहोळ लागला, त्याठिकाणी थोडा झरयासारखा प्रवाह होता, त्यामुळे, "मी पुढच्या वाटेने राजिंगण नावाचं ते ठिकाण शोधतो, मिळालं तर ठीक नाहीतर इथे अपल्याला पुरेल एवढं पाणी असल्याने आपण इथे जेवण करु, त्यामुळे मागे थांबायला सांगितलेल्या सर्व सदस्यांना तू घेवून ये". असं अजितला सांगितलं. आणि मी पुढे सरकलो तसा अजित मागे परतला, त्यानंतर त्या जंगलामध्ये पायाला चकत्या लावल्यासारखा मी तिथल्या भौगोलिकतेचा अंदाज घेत वाट शोधत राहिलो, बरं पाण्याच्या आवाजाचा कानोसा घ्यावा म्हटलं तर त्यावेळी त्या जंगलामध्ये वारयाने झाड़े हालत होती त्यामुळे त्याचा ही आवाज येत होता. तरीही जंगलातल्या त्या इवल्याश्या वाटेने समोर येणाऱ्या झाडांच्या फांदया बाजूला करत वेडापिसा होवून ते ठिकाण शोधून काढण्याच्या तीव्र इच्छेने मी चालत होतो, चालत चालत अंदाज घेत बराच पुढे गेल्यावर एक मोठा ओहोळ मला दिसला. आणि किंचितही पुढे न सरकता माझी पावलं मागे वळली ती माझ्या सर्व सदस्यांना त्याठिकाणी घेवून जाण्यासाठी. तसा मी मागे येण्यास निघालो.



इकडे मला यायला उशीर झाल्याने जेवणासाठी सोबत नेलेले चिकन मीठ मसाला लावून पुनच्छ पिशवी मध्ये ठेवले गेले होते, व ते मला हाका मारत होते, दुरुनच मी सर्वाना आवाज देवून यायला सांगितले, तसे सर्वजण माझ्या दिशेने चालू लागले, सर्व सदस्यांना घेवून मग आम्ही जंगलातील ती पायवाट तुडवत काट्या कुटया बाजूला सारत त्या राजिंगण पाशी आलो. सर्वजण ती जागा बघून आनंदुन गेले, चालताना आलेला शीण विसरून गेले. एका मोठ्या ओहोळामध्ये नैसर्गिकरित्या एकाखाली एक असे तीन छोटे तलाव तयार झाले होते. तिथलं पाणी अतिशय गार होतं. काहीजण थेट पाण्यात घुसले तर काहीजण चूल मांडून जेवण बनवण्याच्या तयारीस लागले, तिथली नैसर्गिक भव्यता, खूपच विलोभनिय होती, तिथलं वातावरणही खूपच आल्हाददायक होते. तिथल्या दगडांची एक विशिष्ट अशी रचना होती, काही खडक गोलाकार तर काही आयताकृती मोठ्या लाद्यांसारखे पण जाड होते .काही खडक एकसंध होते त्यातूनच पाण्याच्या घर्षणाने ते तीन रांजण खळगे तयार झाले होते. सर्वजण तिथे मनसोक्त डूबले. नेहमीप्रमाणे जेवणाची जबाबदारी पेलणारे आमचे सखाराम बुगड़े नावाचे सदस्य, त्यांनी इकडे रस्सा तयार केला होता, त्या गार पाण्यामध्ये अंग गारठल्याने सर्वानी गरम गरम रस्सा भुरकला. काही वेळ मौज करत, छायाचित्रे घेत वेळ झाल्यानंतर जेवण करून, तिथला परिसर स्वच्छ करून आम्ही मग घरच्या दिशेने निघालो. जाताना जवळपास तासभर तुडवलेली ती पायवाट आम्ही येताना अर्ध्या तासात संपवून आईर काकूंच्या घरी आलो, आम्ही नेलेली त्यांची भांडी देऊन, काकुंचे आभार व्यक्त करून, त्यांचा निरोप घेवून आम्ही थेट घरच्या दिशेने निघालो.

खरं तर हनुमंत गडाचा ट्रेक यशस्वी झाला होता, त्यामुळे अर्धी मोहीम आधीच फत्ते झाली होती, पण राजिंगणचा तो परिसर शोधून सापडला नसता तर मोहीम अयशस्वी ठरली असती, निसर्गाचं ते शाश्वत मनोहारी रूप पाहता आलं नसतं. आणि सर्व सदस्य हिरमुसले असते, मनामध्ये तिथपर्यंत पोचता न आल्याची रुखरुख राहिली असती. पण राजिंगणाच्याच कृपेने आणि भांडी व जेवणाच्या सामनाचं ओझं घेवून चालणाऱ्या माझ्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही सहल यशस्वी आणि आठवणीत राहणारी झाली. इच्छा असुनही, काही कारणास्तव आमच्या दोन सदस्यांना या मोहिमेसाठी येता आलं नाही, त्यांची मात्र मी मनापासून आठवण काढली.
धन्यवाद.