लिहायचे किडे "

      काहीतरी कामासाठी बांद्याला गेलो होतो, वाटेत तेरेखोल नदीचं पात्र लागतं, परत येताना नदीच्या पुलावर थांबलो, क्षणभर नदीच्या पात्राचं निरीक्षण केलं, अजूनही ती रक्ताळलेलीच वाहत होती, जखमातून निघणारं रक्त अजूनही थांबत नव्हतं.. पावसाने आता उसंत घेतली होती, जणू आषाढाला बाजूला सारून मध्येच श्रावण उगवला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सात आठ दिवस होऊन गेले. तरीही तिचा प्रवाह पूर्वीसारखा स्वछ, पारदर्शक, निलवर्णी दिसत नव्हता. लोकं म्हणतात निसर्ग कोपलाय. तसा पाऊस पडंतच आहे अधून मधून, दिवसातून एक दोन सरी येतच आहेत. तरी अतिवृष्टीला बळी पडलेल्यांना, पूरग्रस्तांना सावरायला निसर्ग मदतच करत होता. खरं तर निसर्गाएवढा दयाळू, संयमी, शहाणा कोणीच नाही. वर्षानुवर्षे माणूसच निसर्गावर कोपल्यासारखा वावरतोय म्हणून आज निसर्गाच्या संयमाचा बांध फुटला आणि मानवाने डोंगराला केलेल्या जखमातुन ओघळणारे रक्त नदीच्या प्रवाहातून वाहत आहे.

       
            नदी पुर्वीही वाहतच होती, डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने मातीची धूप होऊन पाणी गढूळ व्हायचं, शेतकऱ्याने शेतीची मशागत केल्यानंतर गढूळ झालेलं पाणीही नदिलाच मिळायचं त्यामुळे तेव्हाही तिच्या प्रवाहाचा रंग बदलत होताच, आम्ही लहान असताना शेतात वावरताना या गढूळ पाण्याला गमतीने चहा म्हणायचो. पाऊस चालू असताना हा गढूळ पाण्याचा प्रवाह घेऊन नदी वहायची पण जसजसा पाऊस ओसरायचा तसतसा नदीचा प्रवाह पूर्वीसारखा स्वछ व्हायचा, आजमात्र पावसाने उसंत घेतल्यावर सात आठ दिवस होऊन गेले तरीही नदी रक्ताळलेलीच वाहत आहे. मधल्या वर्षात माणूस एवढा काही निसर्गावर कोपलाय की अतिवृष्टीमध्ये नदीचं पाणी जो चहाचा रंग धारण करायची तिच नदी आज रक्तरंजित होऊन वाहू लागलीय आणि तशीच वाहतेय पावसाने उसंत घेतल्याच्या सात आठ दिवसानंतरही.



        त्यादिवशी शाळेत असताना शिकलेला एक पाठ आठवला, मी थेट इयत्ता तिसरीच्या वर्गात पोहोचलो होतो. मला आठवला तो डोंगरदादा, तो डोंगरदादा फारच दुःखी होता, एकटेपणामुळे कष्टी होता. कुणाची सोबत, संगत नाही . हसायला, बोलायला, खेळायलाही कुणी नाही. एकदा नवल घडतं, डोंगराच्या कुशीतून एक रोपटं वर येतं, घाबरत घाबरत डोंगरदादाला विचारतं, मी राहू का इथे? डोंगरदादाही खूप आनंदीत होतो. रोपट्याला आसरा देतो. नंतर अजून काही रोपटी आली, डोंगरदादाने ती वाढवली, डोंगर दादाच्या कुशीत रोपट्यांची झाडे झाली. काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला, गवत वेलींनी सजला, रंगीबेरंगी फुलांनी नटला, खूपच शोभून दिसू लागला.
        डोंगरदादाचे घनदाट जंगल सिंहाच्या दृष्टीस पडते. आयाळ हलवत तो डोंगरदादाकडे आला, सिंहाने गर्जना केली. डोंगरदादाच्या कुशीत गाढ झोपलेली झाडे, झुडपे, वेली थरथरली, खडबडून जागी झाली. डोंगरदादाचे वैभव पाहून त्यानेही डोंगरदादाला विचारले, मी राहू का इथे? डोंगरदादाने आपल्या गुहेत त्याला राहायला दिले. डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु आले. वाघ, हत्ती, जिराफ, कोल्हा, अस्वल, लांडगे, हरणे, ससे, माकडे आली. प्राण्यांचा गलबला सुरू झाला, डोंगरदादा ला खूप आनंद झाला.
        झाडे फळाफुलांनी बहरली. त्यांच्या घमघमाटानं पक्षी आले, घरटी बांधून राहू लागले, घिरट्या घालू लागले, पक्षांची झुंबड उडाली, त्यांची किलबिल सुरू झाली. पशुपक्षांना कळून आले. झाडे आपल्या उपयोगी पडतात, गोड फळे खायला देतात, गार जागा राहायला देतात, पक्षांनी फळे खाल्ली, त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या, अजून झाडे तयार झाली.
        डोंगरदादाचा एकटेपणा संपला, डोंगरदादाजवळ ढग आले, डोंगरदादाने त्यांना जवळ घेऊन खेळवले. ढग गडगडू लागले, त्यातून पाऊस पडू लागला, झाडे भिजू लागली. डोंगरदादा गाऊ लागला, जंगलानेही ताल धरला.         


         या पक्षांनो या सगळे
         खुशाल खा या गोड फळे
मधुर मध हा फुलांतला
तुमच्यासाठी साठवला
पाऊस भरपूर पडायला
जंगल हवे राखायला.



लेखक शंकर त्र्यं पाटील यांचा हा पाठ त्यावेळी शाळेत शिकत असताना पुन्हा पुन्हा आनंदाने वाचायचो, त्यावेळी फारसं काही कळत नव्हतं, पण वाचताना छान वाटायचं, म्हणूनच आजही तो आठवणीत आहे.
        

        नदीतून रक्त का वाहतंय? याचा विचार मात्र इथल्या प्रत्येकाने केला पाहिजे, निर्बंध डावलून नदीच्या पात्रात केल्या जाणाऱ्या वाळू उपसामुळे नदीचे तिर तुटून मोठया प्रमाणात मातीची धूप होत आहे. नैसर्गिक वनस्पतींची जैवविविधता नष्ठ करून त्याठिकाणी केले जाणारे काजू, आंबा, रबर, केळी, अननस या सारखे प्लांटेशन हे आपलं अर्थकारण बदलतील पण ते शाश्वत मात्र नाही. डोंगराला घट्ट पकडून धरणारी झाडे तोडून आपण निसर्गाला बाधा पोहोचवत आहोत, म्हणूनच डोंगर कोसळण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात घडत आहेत. डोंगर पोखरून डोंगर आणि समुद्र यांच्यातील उंची मधली तफावतच आपण कमी करत आहोत, त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. विकासाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी डोंगर पोखरले जातात, त्याचबरोबर सखल भागात भरावही टाकला जातो, मोकळी झालेली माती पाण्याबरोबर मिसळून पाणी लाल होऊन जाते. मायनिंग ही तर डोंगराला लागलेली वळविच जणू. डोंगर उतारावर केल्या जाणाऱ्या गुरेचराईमुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी गुरेंचराईला बंदी घालू शकणारे शासन या ऊध्वंसक गोष्टींमध्ये का लक्ष घालत नाही?


        इयत्ता तिसरीच्या पुस्तकात डोकावताना एकटेपणामुळे दुखी कष्टी असणारा हा डोंगरदादा आज झाडाफुलांनी बहरलेला आहे, पशु पक्षांचा सहवास त्याला आहे, अंगाखांद्यावर खेळवायला ढगही आहेत पण आजही तो दुखी कष्टीच आहे. त्याला भिती वाटतेय, त्याने खाऊ पिऊ घालून मोठी केलेली झाडे तोडून कोणी त्याला नागडं करेल याची? झाडे नसतील तर सिंहही निघून जाईल, त्यांची गर्जनाही ऐकू येणार नाही, झाडेच नाहीत तर फळे फुले कोठे लागणार, जंगलातील घमघमाट नाहीसा होईल. झाडे नाहीत तर पशु राहतील कुठे? पक्षी घरटी बांधतील कुठे, फळे नाहीत तर खायलाही काही नाही, मग तेही जातील निघून. आंजारायला गोंजारायला ढगही यायचे थांबतील, ढग नाही तर पाऊस नाही, पुन्हा एकटेपणा येईल. या विवंचनेने ग्रासलेल्या हा डोंगरदादाला भविष्यात या भुतलावरील आपलं अस्तित्वच संपुष्टात येईल याचीही भिती नक्कीच वाटत असेल.
        या डोंगरदादाला आपण वाचवलं पाहिजे, पुन्हा शंकर पाटील यांची कविता गुणगुणली पाहिजे, त्या कवितेप्रमाणे वागलंही पाहिजे.


या पक्षांनो या सगळे
खुशाल खा या गोड फळे
मधुर मध हा फुलांतला
तुमच्यासाठी साठवला
पाऊस भरपूर पडायला
जंगल हवे राखायला.

पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला.