दिनांक १९ फेब्रुवारी १६३०, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आई जिजाऊँच्या पोटी एका दैवी पूरूषाचा जन्म झाला, ज्याने इतिहास घडवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन जनतेचे राज्य प्रस्थापित केले, ते दैवी पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
दिनांक १९ फेब्रुवारी २०१९, महाराजांची जयंती कशाप्रकारे साजरी करावी? फक्त महाराजांच्या फोटोला हार घालून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हटलं की शिवजयंती साजरी झाली म्हणावं का त्यांच्या कार्याला अनुसरून आपल्याकडूनही आपल्यापरीने का होईना थोडफार समाजोपयोगी कार्य व्हावं असा विचार मनात निर्माण झाला, मग आमच्या ग्रूप मधील सदस्यांशी चर्चा केल्यानंतर जिवदान शाळेची आठवण करण्यात आली व आपल्याकडून मुलांना जिवनोपयोगी साहित्य भेट म्हणुन देऊ असे ठरवण्यात आले.
सांगली मिशन सोसायटी संचलित जिवदान, मतिमंद मुलांसाठीची निवासी शाळा व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र. शाळा म्हटली की आपल्याला खडू, पाटी, पेन्सिल, वहया, पुस्तके या गोष्टि नजरेसमोर येतात, पण मतिमंद मूलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या गोष्टि त्यांच्यासाठी खूप दूरच्या. कसं उभं रहाव, कसं चालावं, कपडे कसे घालावेत इथपासून ते अगदी स्वतःचे नैसर्गिक विधि कसे करावेत इथपर्यंतचीही जाणीव या मूलांना नसते, अशा मूलांसाठी जिवदान शाळा सर्वतोपरी कार्यरत आहे.
सदर उपक्रमासाठी शाळेची अनुमती घेणे आवश्यक होते, म्हणुन मी आणि माझा मित्र कृष्णा पास्ते प्रथम शाळेमध्ये जावून प्राध्यापिकांशी संवाद साधला, शाळेविषयी, मुलांविषयी जाणुन घेतले, व सदर उपक्रम शाळेमध्ये राबवण्यासंबंधी विनंती केली, त्यांनीही अत्यंत आत्मियतेने आमच्या विनंतीचा स्विकार करून आम्हाला अनुमती दिली.
भेटीचा दिवस उजाडला, ठरलेल्या वेळेत आम्ही सर्वजण शाळेत पोहोचलो, शाळेचे संचालक जोसेफ सरांनी आमचे स्वागत केले. तिथून आम्ही मूलांपर्यंत पोहोचलो, शाळेच्या त्या हॉल मध्ये सर्व मुले सामान्य मूलांनाही लाजवतील अशा शांततेत बसली होती. शाळेचे इतर कर्मचारी व मुलांसोबत आम्ही शिवजयंती साजरी केली. “छत्रपति शिवाजी महाराज की” ऐकताच त्या मूलांच्या तोंडून आपसूक “जय” निघाला आणि त्या हॉल मध्ये आम्हा सगळ्यांवर रोमांच उभा राहीला. संचालक जोसेफ सर आमच्याशी बोलताना म्हणतात, अंध मुले स्पर्षाच्या जाणिवेतून वावरतात, अपंग मुलेही कशीबशी चालतात, मूकबधिर मुलेही सामान्यपणे जगतात पण मतिमंद मुलांच्या जगण्यातही जगण नसतं, ती जाणीवच त्यांच्यात नसते. प्राध्यापिकाही त्यांचे अनुभव आमच्याशी बोलून दाखवतात आणि आमचे आभार मानतात. खर तर आम्हीच यांचे आभार मानले पाहीजेत, कारण आम्ही आजवर स्वतःसाठी जगत आलोय पण या लोकांनी या मुलांसाठी सर्वस्व दिलय. त्यामुळे जिवदान शाळेचे कार्य थोरच.
त्यादिवशी जिवनोपयोगी साहित्य भेट दिल्यानंतर मुलांसोबत वेळ घालवत असताना आमचा विजय नाईक म्हणतो, आपण मुलांसोबत खाली बसू म्हणजे मुले अजून खुश होतील, कृष्णराज देसाई सांगतो, लाख लाख रुपयाच्या क्रिकेट मालिका भरवून लाखो रुपयाचा चुराडा करण्यापेक्षा त्याचा वापर समाजातील अशा घटकांसाठी झाला तर पैसा सार्थकी लागेल, कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, विनोद राणे ची पत्नी तिची लिखीत स्वरूपातील दाद आमच्यापर्यंत पोहोचवते, या सर्व गोष्टि मनाला खूप उभारी देणारया ठरतात. मधेच त्या मुलांपैकी एक मुलगी वेडेवाकडे हावभाव करत आमच्याजवळ येते आणि धन्यवाद देण्यासाठी हात पुढे करते, तिच्या त्या पोचपावतीपुढे सर्वच शब्द फिके पडतील.
हा उपक्रम आमच्या सर्व सदस्यांच्या योगदानामुळे आणि पाठींब्यामुळे आम्ही नवखे असूनही यशस्वीरीत्या राबवू शकलो. त्यामुळे मनाला खूप समाधान लाभलं, समाजातील अशा घटकांसाठी कार्य करण्याची नवी इर्षा निर्माण झाली. कृष्णा पास्तेन उच्चारलेलं “समाजातील आपल्या वरच्या स्तराकडे बघून न जगता खालच्या स्तराकडे बघून जगावं तर जगण्याचा अर्थ कळेल” हे वाक्य नेहमीच स्मरणात राहील.
6 Comments
अप्रतिम दादा!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteनितीन,कृणा तूम्हचा अभिनव खूप प्रेरणादायी आहे हे नक्की, पुढे चालू द्या ़
Deleteअप्रतिम नितीन
ReplyDeleteखूप सुंदर कल्पना.... अभिनंदन💐
ReplyDeleteअप्रतिम शब्दरचना...खूपच सुंदर लेख...Keep it up and work hard....👍🤞
ReplyDelete