लिहायचे किडे "


        कोकण, सामान्यतः कोकण म्हटलं की दिसतात ते समुद्र किनारे, अथांग पसरलेलं निळंशार पाणी, आणि ऐकू येते ती लाटांची गुज, पण एवढयापुरतंच कोकण मर्यादीत राहत नाही. कोकणात याहूनही बरंच काही आहे. सह्याद्रीच्या कुशीत अपरान्तापर्यंत पसरलेला हा कोकण पट्टा नैसर्गिक दृष्ट्या खूपच समृद्ध आहे. तसं कोकण वर्षाचे बाराही महिने तुम्हाला साद घालत असतं. पण अनेक लेखकांच्या लेखणीतुन अवतरलेलं स्वर्गीय कोकण तुम्ही पावसाळ्यामध्ये भरभरून पाहू शकता.


 

      पाऊस, पाऊस कुणाला नाही आवडत, पाऊस सर्वांनाच आवडतो, पाऊस आला की निसर्ग अजून खुलून दिसतो, झाडं, पशु पक्षी सुखावतात, बळीराजा आनंदित  होतो, छोटी छोटी मुलंही पावसात भिजायचा हट्ट धरतात, पर्यटकांनाही फेसाळणाऱ्या धबधब्यांची चाहूल लागते. असं वाटतं की मंदावलेला निसर्ग अचानकपणे जागृत होऊन जणू धावायला लागलाय. म्हणजेच पाऊस पडत असतो, वारा वाहत असतो, झाडं हलत असतात, डोंगर माथ्यावरून पाणी खळाळत असतं, अनेक फेसाळणारे धबधबे वाहत असतात. छोटे मोठे ओहोळ, नद्या वाहत असतात, असं बरंच काही सुरू असतं, डोंगर रांगामध्ये पाहिलं की वाटतं तोही जणू चहासोबत सिगारेटचे झुरके मारत असावा, असा हा एकीकडचा पाऊस.


        पण दुसरीकडे हाच पाऊस जेव्हा मोठ्या प्रमाणात पडतो, आणि सगळीकडे पाणीच पाणी होतं, तेव्हा भयावह स्थिती निर्माण करून, संपुर्ण जनजिवन विस्कळीत करून टाकतो, त्याचा सर्वात मोठा फटका, जो दरवर्षी त्याची आतुरतेने वाट पाहत असतो त्या बळीराजालाच बसतो. अति बरसणाऱ्या या पावसामुळे नद्याही अक्राळ विक्राळ रूप धारण करतात.



         शेतीच्या बाबतीत कोकणाचा विचार केला तर अलिकडच्या काळात इथला शेतकरी काही प्रमाणात फळशेतीकडे वळला आहे, तेवढा अपवाद वगळला तर,  अजूनही कोकणात मुख्यतः भातशेतीच केली जाते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणारे पाण्याचे लोट भातशेती मध्ये घुसुन, शेताचे बांध फुटतात, नुकतीच लागवड केलेली भाताची रोपं गाडली जातात, काही ठिकाणी चिखल वाहून गेल्याने परिणामी रोपंही वाहून जातात. तुकड्या तुकड्यात विभागलेल्या कोकणातील या शेतीमध्ये इथला शेतकरी वाटेअभावी जनावरांना औतासाठी परत नेऊ शकत नसल्याने दुबार लागवडही करू शकत नाही. सखल भागातील शेतजमिनीत तर वरून येणारा पाण्याचा ओढा एवढा मोठा असतो, की ही जमीनच पूर्णतः पाण्याखाली जाते, आणि तिला नदीचं स्वरूप प्राप्त होतं, हे पाणी लगेच ओसरलं तर ठीक, पण साचून राहिलं तर भातशेती कुजून जाते.


       माझ्या मगच्याच ब्लॉग मध्ये मी आरोसबागवासियांच्या व्यथा मांडल्या होत्या, गतवर्षी तर अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी लगतच्या बांदा बाजारपेठेमध्येही घुसले होते, आणि कित्येक दिवस बांदा बाजारपेठ पाणी ओसरेपर्यंत बंद होती,   आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.


       अतिप्रमाणात पडणाऱ्या या पावसाला कारणीभूत मात्र माणूसच आहे, बेसुमार होणारी वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली बनवले जाणारे रस्ते, त्यासाठी कापले जाणारे डोंगर, अशा अनेक, निसर्गाच्या विरोधात होणाऱ्या कृत्यामुळे निसर्गाची हानी होते, निसर्गाचा समतोल बिघडतो आणि अतिवृष्टी सारखी संकटं ओढवली जातात.


       स्वार्थी हेतूंपासून दूर राहून निसर्गाला शाबूत ठेवून शाश्वत विकासातून जेव्हा माणूस प्रगती करेल, तेव्हाच येणाऱ्या असंख्य पिढ्या कोकणाचा उल्लेख "स्वर्गीय कोकण" असाच करत राहतील.


डोंगरदादा