" लिहायचे किडे "
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर, महाराष्टामध्ये पर्वतारोहण करताना, महाराष्ट्राला लाभलेल्या नैसर्गिकतेमुळे, भौगोलिकतेमुळे आणि ऐतिहासिकतेमुळे अवर्णनिय असा अनुभव घेता येतो, स्वर्गीय आनंद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित करण्यासाठी या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा योग्य वापर केला. महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराजांना याच सह्याद्रिने मोलाचा आधार दिला. याच सह्याद्रीच्या साक्षीने महाराजांनी जगाला हेवा वाटेल ऐसे स्वराज्य स्थापन केले. त्या काळामध्ये पर्वतारोहण हे दैनंदिन जिवनाचाच एक भाग होते. महाराष्ट्रामध्ये पर्वतारोहण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळते, एक बळ मिळतं, ते बळ घेऊनच असंख्य शिवप्रेमी पर्वतारोहण करत असतात.
सह्याद्री मध्ये पर्वतारोहण करताना असंख्य गोष्टी अनुभवता येतात. या पर्वतरांगामध्ये असणारी झाडे त्यांची विविधता, पक्षी, त्यांचे आवाज, पर्वतांच्या कुशीत पाय रोवून उभ्या असणाऱ्या त्या वृक्षामुळे निर्माण झालेलं तिथलं आल्हाददायक वातावरण अनुभवता येतं. तिथली माती, दगड त्यांची भिन्नता पाहता येते. पर्वतांची रचना त्यामध्ये असणाऱ्या दऱ्या, हिरवीगार वनसंपदा, त्यातून निर्माण झालेलं सौंदर्य नवचैतन्य निर्माण करतं. काही ठिकाणी पर्वतांवर असणाऱ्या सपाट भागात असणारी गवताळ कुरणेही वेगळा नजारा तयार करतात, सह्याद्रिच्या सौंदर्यात भर पाडतात. समुद्रसपाटीपासून हजारो फुट उंचीवर असुनही सह्याद्रिच्या या कडयांच्या भुगर्भात पाण्याचा साठा मिळतो. हेही विशेष.
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये कडे-कपारीतुन फिरण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत पर्वतांवर उभ्या असलेल्या या गडांना भेटी देवून पर्वतारोहणाचा आनंद नक्कीच घेतला गेला पाहिजे, योग्य ती सुरक्षितता घेवून आणि स्वछता पाळून.
आजच्या जागतिक पर्वत दिनाच्या आपल्याला शुभेच्छा.
0 Comments