" लिहायचे किडे "
मुंबईतील करीअरच्या व्यस्त व्यापाचा बोजाबिस्तरा गुंडाळून गोव्यातील नवीन जॉबसाठी गावी आलो. त्यानंतर काही महीन्यांनी मुंबईस्थित इतर मित्र व त्यांचे मित्र यांना चौकटित घेवून परममित्रांच्या सुचनेनुसार भिशी काढण्यामधे सहभाग नोंदवला.
एकुण १६ सदस्यांची मिळून भिशी काढण्याचे निश्चित झाले, त्यापैकी वैयक्तिकरित्या माझ्याशी ओळख असलेले फक्त ऋतिक रोशन च्या उजव्या हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढे. खरंतर यातील सर्व सदस्य मुंबईस्थित आणि मी एकटा गावी तरीही मी तो निर्णय घेतला.
त्यावेळचा तो निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे, केवळ परममित्रांची माझ्याबद्द्लची असलेली आपुलकी आणि कंत्राटी का असेना पण दरमहा माझा खर्च भागवून काही रक्कम इतर ठिकाणी गुंतवू शकेन अशा पगाराची असलेली नोकरी.
जोपर्यंत जॉब चालू होता तोपर्यंत आर्थिक मीटर चालू होता, त्यामुळे भिशीच्या रकमेची गरज वाटली नाही, पण डिसेंबर २०१९ नंतर जॉबचं कंत्राट संपुष्टात आल्यानंतर आर्थिक मीटर बंद पडला आणि मनात भिशीची ओढ निर्माण झाली.
नोकरी सुटल्यामुळे मला भिशीसाठी दरमहा रक्कम बाजुला करणे कठीण वाटू लागले, LIC सारख्या इतर गुंतवणुकीही होत्या, तसेच करिअरच्या पूढील वाटचालीसाठी काम करणे गरजेचे होते, त्याप्रमाणे माझे व्यावसायिक मनही वैचारिक दृष्ट्या जागृत झाले होते. त्यादृष्टिने काम करण्यासाठी भांडवलाची गरज होती. त्यामुळे जानेवारी २०१९ पासुन भिशीच्या रकमेसाठी माझा मित्रांकडे तगादा सुरु झाला. पण हो ला हो करत वेळ मारुन नेण्यापलीकडे मित्रांकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. मधल्या काळात आर्थिक घडी बसवण्यासाठी माझे तुटपुंजे प्रयत्नही चालू होते. त्यानुसार नवीन नोकरीचा शोध घेत होतो. त्याप्रमाणे एका ठिकाणी नोकरी केलीही. पण तिथे असणाऱ्या कामाच्या व्यापातून होणारा त्रास आणि मिळणारा मोबदला यांचा विचार करता माझं व्यायसायिक मन तिथे रमेना. त्याचदरम्यान जून्या नोकरीचा अडकलेला शेवटचा पगार मिळाला आणि चालू असलेल्या नोकरीला मी रामराम ठोकला. मिळालेल्या रकमेतुन गावातील इतर मित्रांच्या सहकार्याने एक दुकान सुरू केले. पण नवा व्यवसाय किती वेगानं बरं चालेल तो! त्यामुळे भिशीच्या रकमेसाठी तगादा चालूच होता.
पण मे महीना उलटून जून उजाडला तरीही मी वंचितच. खरंतर भिशीच्या या आतापर्यंतच्या काळात दोनवेळा माझ्या नावाचा पुकारा झाला होता, पण अंगातील समाजकार्याचा लुप्त किडा वळवळला. निदान या जाणीवेतून तरी तीसऱ्या वेळेस भिशीची रक्कम मला मिळणे अपेक्षित होते, पण काही सदस्यांनी रक्कम जमा करण्यास केलेली टाळाटाळ आडवी आली.
सदर भिशीमध्ये परममित्रांचा सहभाग असल्याने भिशीची रक्कम कधितरी मला मिळेल यात तिळमात्र शंका नाही, पण योग्यवेळी रक्कम न मिळाल्याची खंत मनात कायम राहील. भिशीच्या या अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्की शिकलो, एखादया गोष्टित शारीरीकदृष्ट्या आपला सहभाग नसेल तर आपणास गृहीतच धरले जाते.
0 Comments