ती तीच असते.
संपूर्ण जगाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणची भौगोलिक, नैसर्गिक रचना वेगळी, संस्कृती वेगळी, तिथल्या चालीरीती, बोलीभाषा, राहणीमान वेगळे,त्याचप्रमाणे ती. ती तीच असते, पण तीची वागणूक मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळी. तीच ती खुर्ची.
तुम्ही टपरीवरचा चहा पिला असेलच, वडापावही खाल्ला असेल. तिथे तीला पहिलंय का कधी? क्वचित कुठे दिसली तर, बहुतांश ठिकाणी तरी नसेलच. तिथे ती अनुपस्थितच असते. कारण तिला माहीत असतं, तिथे तुम्ही तिला काडीचिही किंमत देणार नाही आहात. ती असली तरी तुम्ही तिच्याकडे कानाडोळा कराल. टपरीवरचा चहा, नाश्ता खुर्चीवर बसून केला तर टपरीची फिलिंग कशी येईल राव, नाही का?
आता आपण हॉटेलमध्ये जाऊ. इथे तुमची छाती फुगेल बघा. राणीसाहेब वाटच बघतेय तुमची. तेही तिच्या सख्यांसोबत. इथे तुम्ही चहा प्या, नाश्ता करा किंवा जेवण करा. ती तुमच्या सेवेसाठी तत्पर. जेवढे जास्त वेळ बसाल तेवढी ती खुश, कारण तिचा मालक खुश. फक्त बसताना तिला बाहेर खेचायची, बसल्यावर आत ओढायची. त्याचप्रमाणे उठताना परत बाहेर ढकलायची. इथे मात्र तुमचा कस लागू शकतो. उठल्यावर तिला परत आत ढकलली तर तुम्ही शिस्तप्रिय आहात असं त्या हॉटेलच्या वेटर तरी नक्की वाटेल.
अशी ती म्हणजेच खुर्ची, कदाचित अजूनही काही ठिकाणची तिची रूपे, तिची वागणूक विस्तारानं मांडता येवू शकेल, पण तूर्तास एवढंच.
धन्यवाद...
सलून मध्ये मात्र तुम्हाला नंबर लावावा लागेल. इथे नंबर लावल्याशिवाय ती कोणाला बसायलाच देत नसते. तुम्ही जेवढा लवकर नंबर लावाल तेवढं लवकर तुम्हाला बसायला मिळेल. पण फार काळ नाही हा, तुमचं काम झालं की लगेच तुम्हाला उठायचंय. पाण्याने असो किंवा बिनपाण्याने तुमची हजामत करण्यासाठी न्हाव्याला मदत करणारी तीच. पण तिची एक खासियत अशी की तिच्या मालकाला मात्र तिच्यावर बसण्याचा अधिकार नाही.
आता नोकरदारांसाठी ऑफिस मध्ये वाट पाहणारी ती, तिची तजविज केलीय ती खास तुमच्यासाठीच, तुमच्याशिवाय इतर कोणाचा तिच्यावर बसण्याचा अधिकार नाही. आणि तुम्हाला तिच्यावर अधिक वेळ बसून राहण्याचा मोह नाही. नामर्जिने ऑफिस मध्ये काम करण्यासाठी आलात की बसाल, ते कधी एकदा तिला सोडून घरी जातो याची वाट पाहत. ती तुम्हाला हवी तर असते पण तिच्यावर जास्त वेळ बसून राहण्याची तुमची इच्छा मात्र नाही.
सिनेमा, नाटक बघण्यासाठी गेलात तर तिथे ती असते, पण तिच्यावर बसण्यासाठी तुम्हाला तिकीट काढून जावं लागेल. एखादं नाटक किंवा सिनेमा तुम्हाला आवडला असेल तरच तुमचा जास्त वेळ बसून राहण्याचा अट्टहास, प्रयोग कंटाळवाणा असेल तर तो कधी एकदा संपतो याची वाट पाहत बसाल, एसी असेल तर या तिच्यावर झोप काढणारे महाभागही तुम्हाला तिथे सापडतील.
लहानपणी शाळेत असताना वर्गातही ती असायची. संबंध वर्गात डेस्क आणि बेंच ते ही फळ्यासमोर तोंड करून, अगदी शिस्तप्रिय आणि ही बया एकटीच एका टेबलच्या आड विरुध्द दिशेला तोंड करून. ती एकाच व्यक्तीची वाट पहायची, त्या व्यक्तीलाच तिच्यावर बसण्याचा अधिकार. शिक्षक तळमळीने शिकवणारा असेल तर तिला मध्ये मध्ये आराम, आणि बसल्या जागेवरून शिकवणारा असेल तर तास सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तिच्या अंगावरचं ओझं काही उतरत नाही.
राजकीय खुर्ची, तिच्यासाठी राजकीय व्यक्तींची भारीच चढाओढ, तिला सगळ्यात महागडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वतोपरी खटपट करून जनमत आपल्या हाती कसं खेचून आणायचं आणि तिला मिळवायचं, हे या लोकांना बरोबर माहीत असतं. पण प्रचंड रस्सीखेच असल्याने ती कुणाला मिळते, तर कुणाला वाट पहायला लावते. खरंतर तिच्यावर कोणी बसावं हे ठरविण्याचा हक्क फक्त जनतेला, पण प्रत्येक वेळी तसं होतंच असंही नाही.
सगळ्यात आपुलकीची ती आपल्या घरीच असते, अगदी तासंतास तिच्यावर बसावं, मनाला वाटेल तेव्हा. वाटेल तेव्हा उठावं. इथे कुणाचाच हस्तक्षेप नाही. तुम्ही अगदी पाहुण्या, रावळ्यांकडे गेलात तरीही उंबऱ्याच्या आत प्रवेश करताच तुमचा पाहुणा तिला पुढे करेल. आणि तिच्यावर बसायचा मान तुम्हाला देईल. तुमच्याकडे पाहुणा आला तर तुम्हीही त्याला तशीच वागणूक द्याल, त्याच्या मान, सन्मानासाठी तिलाच पुढे कराल.
अशी ती म्हणजेच खुर्ची, कदाचित अजूनही काही ठिकाणची तिची रूपे, तिची वागणूक विस्तारानं मांडता येवू शकेल, पण तूर्तास एवढंच.
धन्यवाद...
0 Comments