"पूर्व दिशेला प्रणाम करुनी सूर्यनारायणाला, चिपळ्यासंगे पावा वाजवित मोरपीस टोपीवाला, माता भगिनी पिता बालके साऱ्यांना सांगायाला, सारं गाव जगवायाला आला आला वासुदेव आला",
"वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम",
"वासुदेव आला हो वासुदेव आला सोनसकाळी वासुदेव आला".
वासुदेव म्हटलं की अशाच काही गाण्यांची आठवण येते, आणि समोर वासुदेवाचं देखणं रूप दिसायला लागतं. मला विचारलं तर, मला सर्वप्रथम दिसतं ते रविंद्र महाजन यांनी "देवता" या चित्रपटामध्ये साकारलेलं ते वासुदेवाचं रूप. आणि कानात वाजतात ते शब्द म्हणजे
"दानपावलं....हं दानपावलं, वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला"
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असलेल्या अनेक लोककलांपैकी, वासुदेव ही महाराष्ट्राची एक लोककला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे. आजही काही अंशी वासुदेव समाजाकडून ती जोपासली जात आहे. बदलत्या काळानुसार आर्थिक सुबत्तेसाठी या समाजाला आपली पारंपरिकता बाजूला ठेवून इतर व्यवसायांकडे वळावे लागल्याने पूर्वी सहजपणे दिसणारा वासुदेव आजकाल आपल्याला क्वचितच दिसतो, पूर्वी लहान सहान पोराबाळांंनाही न सांगता माहीत झालेला हा वासुदेव आजच्या काळात पोराबाळांंना सांगितल्याशिवाय कळत नाही. त्यांना तो बघायला मिळतो फक्त चित्रातच.
त्यादिवशी तुळशी बारसीच्या दिवशी हा वासुदेव अनपेक्षितपणे आला, अचानक खूळळुक खूळळुक आवाज कानावर पडला म्हणून बाहेर येऊन बघितलं तर डोक्यावर मोरपिसांची, मोतीमाळेने सजलेली शंखाकृती उंच टोपी, त्यामध्ये फुले खोचलेलीे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, अंगात सदरा त्यावर कोटी, खाली धोतर, गळ्यात शेला, खांद्यावर एका हाताने झोळी घेवून आणि दुसऱ्या हाताने टाळ वाजवत गाणी गात, त्याच्या दृष्टीस पडेल त्याच्याकडे प्रफुल्लित नजरेने स्मित हास्य करत, साऱ्यांना जागवत हा वासुदेव रस्त्याने चालताना दिसला.
तसं कोकणातलं माझं घर थोडं निसर्गाच्या कुशीतलंच असं म्हणायला काहीच हरकत नाही, कागदोपत्री मुक्काम पोस्ट म्हणून लागत असणारा आमचा गाव साधारण चार ते पाच किलोमीटर लांब, मध्ये डोंगर, येण्याजाण्यासाठी रस्ता आहे पण डोंगरातील खडकाळ रस्त्याने सहजपणे गाड्या जातील असा नाही. त्यामुळे आम्हीही दैनंदिन जिवनात या रस्त्याचा फारसा उपयोग करत नाही, आम्हाला खरी कनेक्टिव्हिटी आहे ती बाजूच्या दुसऱ्या गावातून, आमच्या वाडीमध्ये येण्यासाठी हा एकच रस्ता असल्याने परतीच्या वाटेतच प्रत्येक घरी पाय लावण्याच्या उद्देशाने हा वासुदेव सरळ रस्त्याने डोंगरापायथ्याशी शेवटच्या घरापर्यंत जाण्यास पुढे गेला आणि आम्ही त्याची वाट पाहू लागलो तो परत दारी येण्याची.
बऱ्याच वेळानंतर, येताना तो आला, मी मात्र बसलो तो हातात मोबाईल घेऊन, त्याला व्हिडिओ मध्ये कैद करण्यासाठी, वासुदेवाचा देखणा पेहराव बघूनच आपले डोळे दिपून जातात, आणि त्याच्या मुखातून येणारी वाणी ऐकून आपण मंत्रमुग्ध होतो, त्यादिवशी दारी आल्यावर त्याने ओटी स्वरूपात नारळ आणि तांदुळाचं ताट घ्यायला सांगितलं, एका हाताने टाळ वाजवण्याचं त्याचं ते कसब मी निरखून पाहत होतो, त्यामूळे आपणही ती टाळ वाजवण्याची कला अंगिकारावी असं मनोमन वाटत होतं. एका हाताने टाळ वाजवत अवकाशातुन पुष्पवर्षाव व्हावा तैशी मुखातून निघणारी त्याची ती वाणी ऐकून आणि त्याने निर्माण केलेला तो छोटासा सोहळा भव्य वाटला, त्यामुळे मन अजूनच प्रफुल्लित झालं. नंतर आमच्याकडे हा वासुदेव थोडा वेळ बसला, एकमेकांची विचारपूस झाली, छोटेखानी नाश्ता करून मग आमचा निरोप घेवून हा वासुदेव त्याच्या परतीच्या वाटेने पुढच्या घरी निघाला.
न थांबता गाणी गात जाणारा हा वासुदेव त्याच्या पेहरावाने आणि गाण्याने एकाचवेळी डोळे आणि कान तृप्त करून जातो, त्यामुळे मनालाही वेगळीच ऊर्जा प्राप्त होते.
आपापल्या परिने लोककला जपणाऱ्या या वासुदेवासारख्या असंख्य कलावंताना माझा मानाचा मुजरा.।।
0 Comments