" लिहायचे किडे "
गडकिल्ल्यांच्या भेटी घेत असताना, गतवर्षी आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने झाराप येथील जिवदान शाळेमध्ये मतिमंद मुलांसोबत शिवजयंती साजरी करुन, मुलांना फुलपाकळी स्वरूपामधे जिवनोपयोगी साहित्य भेट देण्याचा एक छोट्टासा उपक्रम केला होता. त्यानंतर जवळपास वर्षभरात आमची एकही गडभेट झाली नव्हती. आणि अचानक डिसेंबरच्या अखेरीस आमच्या एका सदस्याच्या पुढाकाराने सुस्त पडलेल्या "आम्हाला जेव्हा जाग येते" तेव्हा मोहीम ठरते ती रायगड भेटीची.
रात्रीचा प्रवास..
आम्ही सर्वजण सावंतवाडीचे असल्याने, सदर रायगड भेटीसाठी, भेटीच्या आदल्या दिवशी सावंतवाडीहून निघावं, म्हणजे भेटीच्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचु, तसेच सावंतवाडी ते रायगड हा पल्ला तसा दूरचा असल्याने खर्चिक, म्हणून फक्त रायगड भेट न करता सोबत, परतीच्या प्रवासात गणपतीपुळेच्या गणपतीचे दर्शन घ्यावे असे ठरवून, सर्वानुमते दिनांक ११ व १२ जानेवारी या तारखा ठरविल्या गेल्या. याचं कारण म्हणजे या तारखांचा वार शनिवार, रविवार. तसं योग्यते नियोजन करुन १० जानेवारीला रात्री आम्ही सर्व सदस्यांना गाडीमध्ये घेत, रायगडाच्या दिशेने प्रयाण केले.
प्रवासामधे थोडं अंतर कापल्यानंतर आम्ही गाडीतच छोटेखानी नाश्ता केला. रात्रीचा प्रवास असल्याने थोडावेळ मजामस्ती करून सर्वजण झोपून जातील असे वाटले होते. पण रायगड भेटीच्या त्या प्रचंड उत्सुकतेपोटी झोप लागेल तर नवल ना. तरीही गप्पा गोष्टींच्या नादात जबरदस्ती जमेल तशी झोप आम्ही घेतली. या पूर्ण प्रवासामधे आमच्या ड्रायव्हर सोबत जागं राहण्याचं महत्वाचं पद सांभाळलं ते आमचा शिलेदार श्रीयुत विजय नाईक याने.
पहाट..
रायगड दृष्टीक्षेपाच्या जवळ आल्यानंतर उत्सुकता अजून ताणली गेली. तसं झालंही पाहिजेच, कारण तो छत्रपतीं शिवाजी महाराजांचा श्रीमान रायगड होय. साधारण सकाळी साडेसहा च्या दरम्यान आम्ही पाचाड गावी पोचलो. तिथे एका ठिकाणी प्रातःविधी व आंघोळीसाठी आम्ही थांबलो. सर्वजण तयार झाल्यानंतर तिथेच नाश्ता करून साडे आठ च्या दरम्याने आम्ही रायगडाच्या पायथ्यापर्यंत गाडीने पोहोचलो.
पायथ्याशी असलेली गर्दी पाहून अजूनच हुरूप आला. "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "हर हर महादेव" च्या जयघोषात आम्ही गड चढण्यास सुरवात केली. गड चढत असताना सोबत भेटणारी ती छोटी छोटी मुलं, बाया-बापडी माणसं, हातात काठी घेऊन चढणारी वयस्कर माणसं पाहून वाटेतच दैवी साक्षात्कार झाला. संपूर्ण वाटेमधे काही-काही ठिकाणी आम्ही क्षणचित्रे घेत घेत तब्बल दोन तासानंतर गडावर पोचलो. आणि पावन झालो.
गडाचा मुख्य दरवाजा, तिथले बुरुज, गडावरील हत्ती तलाव, गंगासागर तलावातील ते निर्मळ जल, टेहळणी बुरुज, पाण्याची टाकी, हत्ती खाना, होळीचा माळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, नगारखाना, राजसदर, खलबतखान्यातील काळोखा अंधार, धान्याची कोठारं, अष्टप्रधानांचे वाडे, बाजारपेठ, राणी वसा, मनोरे, दारू कोठार, टक मक टोक, कोलिंब तलाव, दुरून एखाद्या मशिदीप्रमाणे वाटणारे जगदीश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, वाघ्या कुत्र्याचा पुतळा अशा काही ठिकाणांना आम्ही भेटी दिल्या, तिथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजसदरेतील अडथळा वाटत असलेल्या भल्या मोठ्या खडकामागचं रहस्य जाणून घेण्यात मोठ्ठ कुतुहुल वाटलं. ते रहस्य जाणून घेण्यासाठी संबंधित गाइडला विचारणा केली, तर ते खडक म्हणजे शिवकालीन माईक सिस्टीम चा भाग असल्याचे कळले. त्याची प्रचिती आम्हाला यावी यासाठी संबंधित गाइड ने आम्हाला महाराजांच्या मेघडंबरी जवळच्या बाजूला उभे राहण्यास सांगितले व स्वतः राजसदरेच्या मुख्य दरवाजाच्या कडेला जाऊन पुटपटू लागला, त्याचं ते बोलणं आम्हाला त्या अंतरावरुनही स्पष्टपणे ऐकू येत होतं. नंतर त्याने आमच्याजवळील एक तिकीटाचा कागद टर् करून फाडला. साधारण पन्नास मिटरच्या अंतरावरून आलेला कागदाच्या फाटण्याचा तो टर् र आवाज असा काही ऐकू आला की आमच्या अगदी समोरच कागद फाडला गेलाय, आणि आपसूकच सगळ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. रायगडाच्या भग्न अवशेषांच्या सानिध्यात तो आवाज ऐकताना, जेव्हा रायगड वैभवशाली होता त्यावेळी त्या आवाजाची ताकद किती असावी याची कल्पना करवून गेलो.
गडउतार..
जगदीश्वराचे दर्शन घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही गडावरच सोबत नेलेली शिदोरी खाल्ली. संपूर्ण रायगडाचे जवळपास बाराशे एकरचे क्षेत्र फिरण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतात, त्यामुळे हिरकणी बुरुज, अंधेऱ्या लेण्या, हनुमान टाके, शिरकाई देवी मंदीर, भवानी कडा, बारा टाकी अशा काही ठिकाणांना भेट देणं शक्य झालं नाही. टक मक टोकाच्या कड्यावर जाऊन तिथली भिषणता अनुभवली, आणि गडउतार होण्यासाठी आमची पावलं पडू लागली, त्या दिवशी प्रथमतः पाहिलेला तो श्रीमान रायगड नजरेत साठवून आम्ही कधी गडउतार झालो कळलेच नाही. संपूर्ण रायगड न्याहाळत असताना काही बेजबाबदार पर्यटकांकडून गडावर फेकला गेलेला कचरा, पाण्याच्या बॉटल्स बघून मनाला दुःख झालं. हाच कचरा उचलताना, शिवभक्तीने प्रेरित झालेले तरुणही आम्हाला दिसले. रायगडावर जाणाऱ्या वाटेचं, चालु असलेलं डागडुजीचं काम बघून बरं वाटलं, गडावरही काही जुन्या बांधकामांची डागडुजी चालू होती. अशाच पद्धतीने रायगड संवर्धनाचं काम होऊन, छत्रपतींच्या श्रीमान रायगडास गतवैभव प्राप्त व्हावे हीच इच्छा.
परतीचा प्रवास..
गडउतार झाल्यानंतर आमची गाडी गणपतीपुळेच्या दिशेने धावू लागली, गणपतीपुळेला राहण्याची सोय झाल्यानंतर, आम्ही रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. सकाळी गणपतीचे दर्शन घेतलं. प्रदक्षिणा घातली, व तिथून आरेवारेच्या किनाऱ्यावर गेलो. समुद्राच्या लाटांची गुज ऐकत, सुरुच्या बनात आम्ही जेवण बनवून जेवलो. किनाऱ्यावर एक फेरफटका मारल्यानंतर आमचा सावंतवाडीच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू झाला.
पूर्ण सहली दरम्यान आमच्या सर्व सदस्यांचं, नेहमीप्रमाणेच एकमेकांना मोलाचं सहकार्य मिळालं, त्यामुळेच रायगड भेट आणि गणपतीपुळेची ही सहल, आठवणीत राहणारी ठरली, मनाला भरपूर आनंद देऊन गेली. यासाठीची महत्वाची जबाबदारी सांभाळलेल्या आमच्या कृष्णराज देसाईचा यावेळी उल्लेख व्हायलाच हवा.
पुनः भेटूच......
7 Comments
खूपच सुंदर
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम मित्रा
ReplyDeleteMast bhava
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete