लिहायचे किडे "



            महिना, शेतीची कामे आटोपली होती. लॉकडाऊनमुळे बाहेर फिरता येत नव्हतं, त्याची कमतरता भासत होतीच. आता थोडं थोडं अनलॉक होत होतं, त्यामुळे कुठे तरी फिरायला जावं असं सारखं वाटत होतं. आमची एक हक्काची जागा तिथे आम्ही कायमच धावत असतो. आमचा मित्र विजय याचं गाव, त्याचं घरही त्या डोंगरावरच, त्यालाही भारीच हौस आम्हाला सारखं सारखं बोलवून त्या जंगलात फिरवायची. त्यामुळे तो नेहमीच आग्रह धरत असतो. त्यादिवशी त्याला आम्ही येणार हे माहीत नव्हतं, त्या डोंगरावर बीएसएनएल वगळता कुठलंच नेटवर्क नसतं, आणि पाऊस जास्त असला की बीएसएनएलचा पण बोजवारा उडालाच समजा. त्यादिवशीही पाऊस भरपूर होता त्यामुळे आम्हीही त्याला कल्पना देऊ शकत नव्हतो. तसे मग त्याला न कळवताच आम्ही कुंभ्रलच्या दिशेने निघालो.


            विजयच्या घरी पोचल्यावर तो मात्र आश्चर्यचकित झाला. कारण असे अचानक आजपर्यंत कधी आम्ही गेलो नव्हतो. आणि अचानक गेल्यामुळे जंगलात जेवणाचा कार्यक्रम करू शकणार नव्हतो. त्यादिवशी घरी त्याने खाडीचे मासे आणले होते, त्यामुळे आपण जंगलात फिरायला जाऊ पण जेवण घरी येऊनच करू असं त्याने ठरवलं आणि आईला जेवण बनवायला सांगितलं, तसे आम्ही घरातून बाहेर पडलो जंगलातील त्या सफरीसाठी.

            गर्द अशा हिरव्यागार वनराईतुन जंगलातील झाडांच्या फांद्या बाजूला सरकवत निसर्गाच्या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत निसर्गाच्याच सोबतीने डोंगराच्या या हिरव्या कुशीतून आम्ही चालू लागलो. कोकणामध्ये घनदाट जंगलातून एखादा ओहोळ किंवा नदी डोंगराच्या कड्या कपारीतून वाट काढत वाहत असते. अशीच एक छोटी नदी चालताना वाटेतच आम्हाला मिळते. त्यादिवशी पावसाचा जोर जास्तच असल्याने ही नदी काठोकाठ भरुन वाहत होती, स्वच्छ पाण्याचा दुधाळ फेसाळणारा प्रवाह घेऊन. ढगातून पडलेलं पावसाचं पाणी जमिनीला स्पर्श होताच जराही वेळ न दवडता सागराला जाऊन मिळण्याच्या तीव्र इच्छेने जणू व्याकुळ होऊनच या नदीतून अगदी खळाळत अव्याहतपणे वाहत होतं.
पाण्याचा वेग जरा जास्तच असल्याने हत्तीच्या पावलांनी पाय घट्ट रोवून हळूहळू सरकवत आम्ही नदीतून चालायला लागलो. साधारण गुडघ्यावर पाणी असलेल्या नदीच्या पात्रातून, वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाला बळी न पडता आम्ही नदीच्या या बाजूने दुसऱ्या बाजूला पोहोचलो.


            नदीच्या पाण्याचा उपयोग करून विजयच्या घरच्यांनी तिथे काही झाडे लावली आहेत. नदीच्या पाण्यावर उभी राहिलेली नारळ, पोफळीची ती सुंदर बाग तिथल्या सौंदर्यात अजूनच भर पाडते. आणि या बागेच्याच वरच्या टोकाला नदीमध्येच असणारा तो मनोहारी धबधबा. एका अजस्त्र भल्या खडकावरून फेसाळत पाडणारं ते पाणी नजरेचं पारणं फेडतं. पूर्ण क्षमतेने कोसळणारा हा धबधबा भुरळ घालतो विष्णूने धारण केलेल्या एकमेव स्त्री अवतारातील सुंदर मोहिनीप्रमाणे. अगदी तस्साच, ज्याप्रमाणे विष्णूने मोहिनी अवतार घेऊन राक्षसांना आपल्या मायाजालात फसवून देवतांना अमृत पाजलं त्याचप्रमाणे फसवणारा. अप्रतिम दिसणारा हा धबधबा कितीही आकर्षित करत असला तरी पावसाळ्यामध्ये याच्या खाली भिजण्याचा मोह कुणीही करू नये. पावसाळ्यानंतर मात्र पाण्याचा प्रवाह जसा कमी होतो तसं या धबधब्याखाली अत्यंत सुखरूपपणे भिजण्याची मजा घेता येते, ही नदी बारमाही वाहत असल्याने धबधबा अविरतपणे कोसळत असतो.

या धबधब्याचे सौंदर्य डोळ्यात खोलवर साठवून आम्ही परतायचं ठरवलं, आता आम्हाला जंगलातील दुसऱ्या एका धबधब्याकडे जायचं होतं, तिथून माघारी फिरल्यानंतर काजूच्या बागेमधून आम्ही चालू लागलो. इथल्या शेतकऱ्यांनी या जमिनीमध्ये काजूच्या बागा तयार केल्या आहेत, जंगलातुनच मिळणाऱ्या काट्याकुटया, वेलींपासून बनवलेली तिथली कुंपणेही एक वेगळं सौंदर्य दर्शवितात. पावसाळ्यात निसर्गही खूपच नटून बसतो, एखाद्या सोहळ्यासाठी नटावा, सजावा तसाच, हिरवीगार शालू पांघरून. डोंगरात दिसणारं धुकं जणू आपण स्वर्गातूनच चालतोय अशी भावना जागृत करतं. पावसाळ्यात जंगलातून भटकण्यातही वेगळीच गंमत असते. हिरविगार वनराई, शुभ्र धुकं, खळाळत जाणाऱ्या ओहोळाचा आवाज, झाडांच्या पानांवरुन घसरत येणाऱ्या पावसाच्या सरिंचा रिपरिप आवाज ऐकत निसर्गाच्या अल्हाददायक वातावरणात भटकणे, म्हणजे स्वर्गसुखच. भटकताना जंगलात चौकसपणे पाहिलं तर बऱ्याच घटकांत असणाऱ्या सौंदर्याचा ठेवा अनुभवता येतो. त्यातूनच मनात ऊर्जा निर्माण होते, आणि कितीही चाललं तरी थकल्याची जाणीव होत नाही.

जमिनीने पोटभर पाणी पिऊन घेतल्यानंतर जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब, गाईच्या
एखाद्या नवजात वासराप्रमाणे लगेच धावू लागतो, डोंगरउतारावरुन वाहताना, हिरव्यागार डोंगरावर ओरखडे मारत पळत सुटतो. याच ओरखडलेल्या वाटेतुन चालत आम्ही जंगलातील त्या दुसऱ्या धबधब्यापर्यंत पोहोचलो. हा धबधबाही तेवढाच सुंदर, मघाच्या धबधब्यासारखा त्याच्यापेक्षाही उंच असलेल्या एका मोठ्या काळ्या खडकावरून कोसळत होता. पाण्याचा प्रवाह मात्र त्यामनाने कमी असल्याने भिजण्यासाठी सुरक्षित होता. अगदी कुणीही यथेच्छ मनमुराद भिजावं. आमची दोस्तमंडळी क्षणाचाही विलंब न लावता या धबधब्याच्या पाठीला पाठ लावून कोसळणाऱ्या पाण्याचा मारा अंगावर झेलू लागली. ओरडत, किंचाळत फुकटात, पैसावसुल आनंद घेवू लागली. दोन, तीन वर्षापूर्वी याचठिकाणी आम्ही आमच्या पूर्ण ग्रूपसह आलो होतो, इथेच जेवण करून जेवलो होतो, जेवण बनवताना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून प्लास्टिक पसरवून तंबू ठोकला होता, त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. दुपारी उशीरापर्यंत आम्ही तिथे वेळ घालवला, आणि डोंगर उतरायला सुरवात केली. जाताना छत्र्या उघडून गेलेलो, येताना मात्र छत्र्या बंद करूनच परतलो. खरं तर धबधब्याखाली भिजण्यापेक्षा त्यादिवशी पडणाऱ्या पावसानेच आम्हाला भिजवलं होतं, जणू आजचा दिवस छत्री वापरू नका असंच तो आम्हाला सांगत असावा.

विजयच्या आईने माशाचं कालवण बनवलं होतं, आणि काही मासे तळले होते. भिजलेले कपडे काढून पिळून परत तसेच अंगावर चढवले, आणि अंगणातच डायनिंग टेबल लावून जेवायला बसलो, गारठलेल्या अंगाने गरम गरम भातावर माशाच्या कालवणासोबत आम्ही ताव मारला. पोटभर जेवून थोडा वेळ आराम करून, त्यांचा निरोप घेऊन मग आमची बाईक निघाली थेट ती सावंतवाडीला आमच्या घरापर्यंत.