" लिहायचे किडे "
तो सोहळाच एवढा अविस्मरणीय असावा की त्याची चाहुल कित्येक दिवस आधी लागावी, आणि दिवसागणिक आतुरता वाढत जावी. तो म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. शिरशिंगे गावातील गोठवेवाडी येथे शिवजयंती एका खास पद्धतीने साजरी केली जाते. ही गोठवेवाडी मनोहर, मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. गडावर छत्रपति शिवजी महाराजांचे ३४ दिवसांचे वास्तव्य होते. त्यामुळे शिवजयंती साजरी करण्यासाठी, छत्रपतिंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरुन शिवज्योत पेटवून ती गडाच्या पायथ्याशी आणली जाते. आणि गोठवेवाडीतील गोठवेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या महाराजांच्या पूर्णाकृति पुतळ्याचे पारंपरिक पद्धतीने पुजन करून शिवजन्म सोहळा साजरा केला जातो. त्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी गड चढून त्या रात्री गोठवेवाडीतील काही युवक, गडकरी गडावर वास्तव्य करतात. व शिवजयंती दिवशी शिवज्योत घेऊन गडउतार होतात.
यावेळी आम्हालाही येण्याबाबत विचारणा झाली. गोठवेवाडीतील आमचा मित्र बाळा घावरे, याच्यामुळे गेल्यावर्षीही आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असाच संध्याकाळचा ट्रेक करून गडावर रात्र काढली होती. तेव्हापासून तिथले बरेचसे युवक, गडकरी आमचे मित्रच बनले. त्यांची आमच्याप्रति असलेली आपुलकी पाहता, जणू काही आम्हीही गडकरीच आहोत की काय, अशी भावना मनात निर्माण होते. याच जिव्हाळ्यापोटी आम्ही लगेचच त्या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शविण्यास तयार झालो. या ट्रेकसाठी फोटोग्राफर असलेला माझा रूपेश नावाचा मित्र पहील्यांदाच माझ्यासोबत सहभागी होणार होता. या सोहळ्याच्या चित्रीकरणाचा मान त्याच्याकडे होता. आणि खास आकर्षण म्हणजे ड्रोन.
दरम्यान मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेलो होतो. १७ फेब्रुवारी ला रात्रीच्या रेल्वेगाडीने दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ तारीखला सकाळी मी सावंतवाडीला घरी पोहोचलो, दुपारच्या जेवणाआधी ट्रेकसाठी लागणारं सामान घेऊन बॅग भरून ठेवली. जेवण करून मग घरातून बाहेर पडलो आणि हायवेला रूपेशची वाट पाहत थांबलो, काही वेळानंतर रूपेश त्याची कार घेऊन आला त्याच्यासोबत ड्रोन ऑपरेट करायला सिद्धांत, आणि अमित हे त्याचे दोन मित्र होते. तिथुन सावंतवाडीत पोहोचल्यानंतर नेहमीचा जोडीदार कृष्णा पास्ते याला घेऊन आम्ही निघालो थेट शिरशिंगेच्या दिशेने.
गडचढाईला सुरवात..
शिरशिंगे मध्ये गोठवेश्वराच्या मंदिराजवळ रामकृष्णसह आमचे इतर गडकरी मित्र आमची वाट पाहत होते. पण या ट्रेकवर एक प्रचंड मोठं सावट होतं, " संध्या छाया भिवविती हृदया या भा. रा. तांबे यांच्या कवितेतील ओळी. तशीच भिती आम्हाला वाटत होती, पण सकारात्मक विचार करून, मंदिराजवळ पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही गडाच्या दिशेने निघालो. गडावर जाण्यासाठी जिथपासून पायवाट सुरू होते त्याठिकाणी गाडी पार्क केली आणि मनात जी भिती दाटली होती ती सत्यात उतरली. दुपारी घरातून निघताना निरभ्र असलेलं आकाश गोठवेवाडीमध्ये येईपर्यंत काळवंडलं होतं, आणि ज्या ढगांच्या सावटाखाली आम्ही होतो त्या ढगांमधून आता बेफामपणे सरी कोसळत होत्या. बराच वेळ गाडीमध्येच बसून राहीलो, माघारी फिरावं लागतं की काय? असा प्रश्न. पण ज्यांच्यासोबत आम्ही होतो त्या गडकऱ्यांच्या मनात हा प्रश्न कदाचित डोकावलाच नसेल. त्यातले काहीजण दुसऱ्या एका गाडीत बसले होते तर काहीजण सोबत नेलेली ताडपत्री गुंडाळून बसले होते.
बऱ्याच वेळानंतर पाऊस गेला, आकाश थोडं मोकळं वाटत होतं. तसे सर्वजण गड चढण्यास सुरवात करू लागले. थोडी चढाई केल्यावर पुन्हा त्या ढगातून सरी कोसळू लागल्या आणि आमच्या मनातून नाराजीचा सूर उमटू लागला. तिथेच एका झाडाखाली थांबलो पण यादरम्यान अर्धवट भिजलो होतो. थोडा पाऊस कमी झाल्यावर पुन्हा गडाच्या दिशेने सरकू लागलो. पण काही अंतर कापताच पुन्हा पावसाने भिजवायला सुरवात झाली. आणि आमचे सर्व सहकारी त्या नागमोडी वाटेत ताडपत्री पांघरून बसले. जणू काही ते माघार घेण्यास तयारच नव्हते. पुन्हा पाऊस शांत झाला तसे सर्व गड चढू लागले. अनपेक्षितपणे आलेला हा पाऊस सुरवातीला नकोसा वाटला असला तरी त्याचा आम्हाला फायदाही झाला. सारं वातावरण अल्हाददायक झालं होतं, तिथल्या निसर्गाच्या सौंदर्यात अजून भर पडली होती, वातावरणात गारवा निर्माण झाला होता त्यामुळे अंगाला घाम येत नव्हता आणि थकवा कमी जाणवत होता. तसेच निसरड्या वाटेवरची माती ओली झाल्याने पायांना व्यवस्थित ग्रीप मिळत होती. आणि चालताना त्रास होत नव्हता. त्यामुळे तो अवकाळी पाऊसही आम्ही एन्जॉय केला. जो अनुभव पुढच्या चार महिन्यानंतर आम्हाला मिळणार होता, तो या अवकाळी पावसाने ऍडव्हान्स मध्ये आम्हाला त्यादिवशी दिला.
पाऊस गेल्यानंतर पुन्हा गड चढू लागलो, सोबत असणारे गडकरी मित्र वेगाने गड चढू लागले. पुढे एका पॉईंट ला ते गडाच्या दिशेने तर आम्ही रामकृष्ण सोबत गरुडभाब च्या दिशेने निघालो. गरूडभाब च्या इथे प्रत्येक पाऊल टाकताना वरती असणाऱ्या मधमाश्यांच्या पोळ्यांचा अंदाज घेत चालू लागलो. इथली वाट थोडीशी निसरडी आहे तेवढं सोडलं तर मधमाशांव्यतिरिक्त इथे कोणताही धोका नाही. गुहेच्या वरचा दगड हा स्तरीत खडकाचा प्रकार वाटतो, काळाच्या ओघात या दगडाचे सुटलेले भाग खाली कोसळत आहेत. मनोहर गडाच्या कडेलाच एका रांगेत पहिली गुहा व त्यापुढे काही अंतरावर दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा पहिल्या गुहेच्या मनाने थोडी मोठी आहे, जणू मनोहर गड जबडा उघडूनच इथे बसला आहे. साधारणपणे चार, पाचशे माणसे एका वेळेस या गुहेत राहू शकतात. इथूनच पुढे मनसंतोष गडावर जाणारी वाट आहे. पण सद्यस्थितीमध्ये गडाच्या अर्ध्यापर्यंतच आपण जाऊ शकतो. त्यापुढचं अंतर कदाचित प्रशिक्षित व्यक्तीच पार करू शकते. त्यासाठी त्यांना प्रस्तरारोहणसाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता भासते. ब्रिटिशांनी कुलफि गोळ्यांचा मारा करून गडावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे मानसंतोष गडाच्या श्रीमंतीला आपणास मुकावे लागले आहे.
गरूडभाबच्या इथून माघारी फिरून आम्ही गड चढू लागलो, आतापर्यंतच्या वाटेपेक्षा पुढची चढण थोडी कठीण आहे, काही ठिकाणी अतिकठिण भासणाऱ्या जागी गडकऱ्यांनी लोखंडी शिड्या बसविल्यामुळे ती वाट, आधीपेक्षा थोडी सुखकर झाली आहे. गडाच्या माथ्यावर चढेपर्यंत अंधार दाटत होता. इकडे आमच्या गडकरी मित्रांनी रात्री थांबण्यासाठी सर्व तयारी केली होती. लाकूडफाटा जमा करून चुली मांडल्या होत्या, बसण्यासाठी ताडपत्री पसरवली होती. त्याचवेळी काही गडकरी मित्र एका वेगळ्या कामात दंग होते. गडावर याआधी साधारण चार वर्षापूर्वी ध्वज फडकवण्यासाठी लोखंडी पाइप बसवला होता. पण गडावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या माऱ्याने तो तुटला होता. त्याठिकाणी आता नवीन पाइप बसवून भगवा ध्वज फडकवण्यासाठीचे काम ही मंडळी करत होते. मघाशी आम्ही गड चढतानाच आमचे गडकरी मित्र हे लोखंडी पाइप घेऊन गड चढत होते.
गडावर पोहोचल्यानंतर..
एव्हाना अंधार पडला होता. प्रचंड मौज मस्तीमध्ये चहा बनविण्यात येत होता. एरव्ही जास्त चहा न पिणारा मी त्यादिवशी चहा पित होतो, आमच्यातील अजूनही काहीजण चहा परत परत मागून पित होते. चहा कोणी डबल पितं का? एखादया अमृततुल्य चहाच्याही पलीकडची चव या चहाला आली होती. इतका अप्रतिम चहा बनला होता, कदाचित चहा बनवणाऱ्या आमच्या मित्राच्या हातची चव आणि गडावर असणाऱ्या विहिरीच्या पाण्याचा विषेशगुण त्यात सामावला असावा. चहा झाल्यानंतर जेवण बनविण्याची तयारी सुरू झाली. जेवण बनवल्यानंतर शिवकाळात मशालींच्या प्रकाशात कशाप्रकारे रात्री जायच्या याचा थोडा प्रत्यय यावा, यासाठी गडावर आढळणाऱ्या कारवी नावाच्या झाडांच्या फांद्यांचा उपयोग करून मशाली बनवल्या होत्या त्या पेटवून शिवमय रात्रीचा छोटासा अनुभव घेण्यात आला. त्यानंतर गडावर असणाऱ्या पाषाण मूर्तींच्या इथे आरती करून जेवणाच्या पंगती बसल्या. जेवण करून गप्पा टप्पा सुरू झाल्या.
आता शेकोटी पेटली होती, थंडीचा प्रभाव जाणवू लागला होता, शेकोटीच्या ज्वाळांची ऊब घेत काही वेळाने सर्वांनी मिळून शिवछत्रपतींवर रचलेली गाणी गायली. संध्याकाळी गड चढताना पडलेला अवकाळी पाऊस गड चढल्यानंतर बराच वेळ शांत होता तो आता पुन्हा डोकावू पाहत होता. छोट्या सरी कोसळत होत्या पण कदाचित त्याचवेळी सुरू झालेल्या वाऱ्यांमुळे हा पाऊस जास्त टिकला नाही. आमचे काही मित्र ताडपत्रीवर आडवे झाले होते, काहीजणांनी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या होत्या. त्यात थोडी रात्र व्यतीत झाली, आणि सर्वच जण डुलकी घेण्यासाठी आडवे पडले. गडावर आता पावसाऐवजी वाऱ्याचा प्रचंड प्रभाव जाणवत होता. सोबत थंडी होतीच, त्यामुळे अंग आखुडलं होतं. वाऱ्याच्या प्रचंड माऱ्यामुळे शेवटी अंगाभोवती ताडपत्री लपेटूनच रात्र काढली, त्यात वाऱ्याची ताडपत्रीशी टक्कर झाली की आवाजही येत होता.
गडावरील पहाट..
सकाळी सहा वाजले तरी वातावरणातील थंडी आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ताडपत्रीतुन सहजपणे बाहेर येणं काही जमलं नाही. शेवटी आळस झुगारून शेकोटी पेटवून सर्वजण ऊब घेऊ लागले. साकाळची चहा करण्याचाही प्रयत्न झाला पण वाऱ्यांचा प्रभाव एवढा की चहालाही आगीची झळ लागत नव्हती. शेवटी तो प्रयत्न निष्फळ ठरला. फ्रेश होऊन सर्वजण ध्वजारोहणासाठी एकत्र जमलो. काल संध्याकाळी उभा केलेल्या त्या पाईप वर भगवा ध्वज मानाने चढवला, वाऱ्यांमुळे तोही डौलाने फडकू लागला. त्याच्यानंतर बॅग पॅकिंग करून सर्वजण पाषाण मूर्तींच्या इथे आलो. तिथे शिवज्योत पेटवली गेली. शिवगर्जना करत आमचे सर्व गडकरी मित्र मग गडउतार होऊ लागले. आम्ही गडावर थोडी फुटेज घेण्यासाठी थांबलो. वाऱ्यामुळे ड्रोन उडवता न आल्यानं गडाचा परिसर ड्रोनच्या साहाय्याने कॅमेरात कैद करणं काही जमलं नाही.
सकाळी साधारण आठ वाजता आम्ही गड उतरायला सुरवात केली. पण वाऱ्याच्या त्या प्रचंड माऱ्यामुळे गड उतरताना भीती वाटू लागली. या आधी गडावर मी दोन वेळा गेलो होतो पण एवढया जोरात वाहणाऱ्या वाऱ्याचा अनुभव मी त्यादिवशी प्रथमच घेत होतो. सावकाशपणे योग्य ती खबरदारी घेत अवघड वाटेवरून आम्ही खाली आलो. नंतर पुढे सकाळच्या कोवळ्या उन्हात क्षणचित्रे घेत आम्ही गडउतार झालो. गडउतार होतानाच वाटेत गडावर जाण्यासाठी आलेले शिवप्रेमीही आम्हाला भेटले.
शिवजन्म सोहळा..
इकडे गोठवेश्वर मंदिराजवळ समस्त गोठवेवाडीकर गडकरी ग्रामस्थ जमले होते. त्यामध्ये लहान थोरांपासून बाया बापडी माणसेही होती. काही महिला पारंपारिक साडीमध्ये सजून आल्या होत्या. गडउतार झालो तरी वाऱ्याचा प्रभाव चालू होताच, थोडा वारा शांत झाल्यावर सिद्धांतच्या हुकुमाखाली ड्रोन उडाला आणि आभाळातून हा शिवजन्म सोहळा पाहू लागला. मंदिराच्या बाजुलाच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गडावरून आणलेली शिवज्योत ठेवून, पारंपारीक पद्धतीने शिवपूजा करण्यात आली. शिवपूजा झाल्यानंतर सर्व शिवप्रेमींच्या मुखातून बाहेर पडलेल्या शिवगर्जना आसमंतात दुमदुमल्या. आणि शिवजन्मसोहळा पार पडला.
सोहळा पार पडल्यानंतर चहा व नाश्ता करून समस्त गडकरी मित्रांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत काही ठिकाणी थोडं चित्रीकरण करून आमची गाडी धावली ती थेट सावंतवाडीच्या दिशेने. संबंध ट्रेकिंगच्या दरम्यान आम्हाला उणीव भासली ती काही कारणास्तव गडावर येऊ न शकलेल्या गडकऱ्यांपैकीच आमच्या छोटू नावाच्या मित्राची आणि अलीकडेच वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे येऊ न शकलेला आमचा मित्र बाळा याची.
0 Comments