लिहायचे किडे "



       एका संध्याकाळी असाच मित्रासमवेत उभा असताना खुळ्ळूक खुळ्ळूक आवाज़ येतो आणि मन प्रफुल्लित होवून लक्ष जाते ते भारदस्त खिल्लारी बैल जूंपलेल्या बैलगाडीकडे.
      
        आताच्या काळात बैलगाडी म्हणजे दुर्मिळ बाब, आम्ही लहान असताना ही बैलगाडी यायची तेव्हा आम्ही तिच्यामागे पळत सुटायचो. कधी ती लाकडाचे ओंडके घेवुन जायची, कधी गवत, कधी शेणाचा उकरड, कधी भाताच्या गोण्या, तर कधी मिठाची पोती घेवुन यायची. अशाच या ना त्या वाहतुकीसाठी ती सतत यायची. खिल्लारी बैलांची जोडी पाहण्याचे ते कुतुहूल आजही तसेच आहे.

      
        आज आपल्याकडे वाहतुकीसाठी अनेक अद्ययावत वाहतुकीची साधने निर्माण झालेली आहेत. तरीही ग्रामीण भागातील काही शेतकरी आपली पारंपारिक साधने आजही आवडीने आणि मोठया मेहनतीने सांभाळतोय व त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवतोय. शाळेत असताना एक गाणं गुणगुणायचो, “माझ्या मामाची रंगीत गाडी तिला खिल्लारी बैलांची जोडी” हे गाणं गुणगुणताना जेवढं बर वाटायचं त्यापेक्षा कितितरी पटीने जास्त बैलगाडी रस्त्यावरुन धावताना पाहील्यावर वाटतं.
      
        शुभ्र पांढरा रंग, उंचपुरा बांधा, लांब शेपुट आणि लाल रंगाने रंगवलेली त्यांची शिंगे यामुळे ते बैल खुपच राजस देखणे दिसतात. अशा बैलांची जोडी बैलगाडीला जोडली की गाडीही शोभून दिसते, या बैलगाडीला, खटारगाडी असेही संबोधतात, उच्च प्रतीच्या लाकडापासून ती बनवली जाते, साधारणता निळा किंवा लाल रंग ही गाड़ी रंगवण्यासाठी वापरला जातो, गाडीला मोठ्ठि दोन चाके आणि घर्षणाने चाकांची झीज होवू नये म्हणून त्यांच्या भोवती लोखंडी रिंग बसवली जाते. 
      
        सध्या शेतकरी वर्ग पावसाच्या काळात जनावरांसाठी लागणारा गवताचा साठा करण्याच्या लगबगीत असल्याने, गवत वाहून नेत असताना आज ही गाड़ी सहजपणे दिसली आणि जून्या आठवणी जागवून गेली, आणि एक गोष्ट निक्षून सांगून गेली, आधुनिकतेच्या शिखरावर तुम्ही कितीही उंच जा पण पारंपरिकतेची कास असलेल्या काही गोष्टि विसरणे तुम्हास महाकठीणच.