" लिहायचे किडे "
दिनांक २५जानेवारी २०२०. त्यादिवशी घरातून निघालो ते दुपारी ३ वाजता थेट शिरशिंगे गावच्या, गोठवेवाडीच्या दिशेने. मी आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत ते सकाळचेच, त्यामुळे या ट्रेकमध्ये नाविन्य होतंच. पण विशेष महत्व काही औरच होते.
साधारण शिरशिंगे गावात पोचल्यानंतर जसजसं गोठवेवाडीच्या जवळ जात जाल तसतसं माथ्यावरती प्रशस्त लांब, समांतर असा दुभंगलेल्या अवस्थेत सह्याद्रीचा उंच भाग दिसतो. या दुभंगलेल्या अवस्थेतील सह्याद्रीच्या भागाचा एक कडा म्हणजे मनसंतोष गड तर दुसरा कडा म्हणजे मनोहरगड. समुद्रसपाटीपासून साधारणपणे तीन हजार फुट उंचीवर उभा असलेला, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने, पावन झालेला हा गड. आग्र्याहून थरारक सुटका करून घेतल्या नंतर राजेंनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या गडाची निवड करून महिनाभर वास्तव्य केले होते. या दरम्यान त्यांच्याकडून स्वराज्यहितासाठी मोहिमाही झाल्या. सावत्र बंधु व्यंकोजी यांच्याकडून वेढा घातलेला रांगणा गडही याच दरम्यान महाराजांनी पुन्हा स्वराज्यामध्ये आणला.
गोठवेवाडीत पोहोचताच गोठवेश्वराचे दर्शन घेऊन पोचलो ते आमचा मित्र बाळा घावरे याच्या घरी, त्याची तयारी चालू होतीच. सोबत गावातील म्हणजेच गोठवेवडीतील गडाच्या पायथ्याशी राहणारे आमचे इतरही सहकारी मित्र होते. त्यादिवशीची ती रात्र गडावरच काढावी असा विचार असल्याने रात्रीच्या जेवणासाठीचे लागणारे सामान, भांडी घेऊन आम्ही थेट निघालो मनोहर, मनसंतोष गडाच्या दिशेने. गडावर जाण्यासाठीची ती चढण तशी सोपीही नाही पण मनात ठाम निर्धार असेल आणि शिवप्रेम असेल तर ती कठीणही वाटत नाही. मग रक्त फक्त सळसळते असावे असेही काही नाही, रायगड भेटीच्या वेळी वयस्कर मांणसांकडून गड चढाई होत असताना बघून मी ते अनुभवलं होतं. आम्हीही साधारण तासाभरात वाटेत क्षणचित्रे घेत, व्हिडिओ चित्रीकरण करत गडावर पोचलो. या गडावर मी आधीही गेलो होतो, त्यावेळी दिशादर्शक फलक सोडले तर गडसंवर्धनाच्या दृष्टीने फार काही काम झालं नव्हतं, त्यामुळे गड चढताना आताच्या पेक्षा आधी गडाची ती चढण मला कठीण वाटली होती. पण आता गडकरयानी गडापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायवाटेची डागडुजी, व कठीण चढणीदरम्यान लोखंडी शिड्या बसवून, धोकादायक ठिकाणी लोखंडी आधार बसवून ती अजूनच सुखकर बनवली, जेणेकरून पाच वर्षाच्या मुलांपासून ते सत्तर, पंच्याहत्तर वयाचे आजी, आजोबाही गड चढतील, आणि ते चढलेही.
गडावर पोहोचेपर्यंत सूर्य अगदी अस्ताच्या जवळ आला होता. गडावरून पाहताना तो सूर्यास्त त्या गडाच्या नावाप्रमाणे अधिकच मनोहारी वाटत होता. गडावर नावाच्या अगदी उलट भासणारा आमचा "छोटू" नावाचा एक मित्र आमची आधीपासूनच प्रतीक्षा करत होता. गडावर ती रात्र काढण्यासाठी योग्य, सोयीस्कर अशी जागा त्याने निवडली होती, तिथेच आम्ही सगळ्यांनी मुक्काम ठोकला.
एव्हाना अंधार पडला होता, उजेडासाठी आम्ही लाकडं पेटवली. चूल मांडली, चहा करून चहाचा आस्वाद घेतला. आणि जेवणासाठीची आमची लगबग सुरू झाली. मस्त जेवण बनवून आम्ही जेवलो. त्या रात्री झोप येईल तरच नवल ना. संपुर्ण रात्र गडावरील त्या वातावरणात मजा मस्ति, गप्पा टप्पा, मध्येच थोडी झोप, परत गप्पा, उद्यासाठीची उत्कंठा, शेकोटी आणि चहा सोबत विरून जात कधी तांबडं फुटलं कळलच नाही.
आता सुरवातीला म्हटल्याप्रमाणे "विशेष महत्व काही औरच होते" मग ते काय होतं बरं! तर आम्ही ज्या दिवशी गडावर पोहोचलो तो दिवस २५ जानेवारी, म्हणजे दुसरा दिवस प्रजासत्ताक दिनाचा. अठराव्या शतकात १८४५ चे मराठ्यांचे बंड प्रचंड ताकतीनिशी मोडून काढत ब्रिटिशांनी गडावर युनियन जॅक फडकवला होता. त्यानंतर तब्बल १७५ वर्षांमध्ये गडावर आपला राष्ट्रीय ध्वज फडकवला नव्हता. याचं औचित्य साधत "सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लब" या संस्थेच्या पुढाकाराने गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गडकरयांचे वंशज आणि गिर्यारोहण प्रशिक्षित महिलांच्या हिरकणी पथकाला घेऊन गडावर तिरंगा फडकवण्यात येणार होता.
तसेच मनसंतोष गडावर जाणारी वाट आजमितीस अस्तित्वात नसल्याने तो गड म्हणजे एका सुळक्याप्रमाणे भासणारं उभं शिखर आहे. त्यावर फक्त प्रशिक्षित गिर्यारोहकच रोप्स व इतर साहित्याच्या आधारे चढू शकतो. सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लब" चे श्री रामेश्वर सावंत व त्यांची प्रशिक्षित टीम, म्हणजेच हिरकणी पथक या मोहिमेअंतर्गत गडावर तीन दिवस आधीपासूनच तंबू ठोकून वास्तव्यास होते. त्यादरम्यान हिरकणी पथकातील महिलांकडून मनसंतोष गडाच्या अभेद्य भिंतीवरून प्रस्तारोहण करण्यात येत होते. व दोन्ही गडांवरून मधल्या दरीच्या दरम्यान व्हॅली क्रॉसिंगची प्रात्यक्षिकेही येणाऱ्या शिवप्रेमींना देण्यात येत होती. त्यामुळे एरव्ही आठवाड्यातून एक, दोन ग्रुपशिवाय जास्त पर्यटकांचा राबता नसणाऱ्या या गडाला एखाद्या यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊन या तीन दिवसात हजारो शिवप्रेमींकडून भेट होत होती.
आदल्या दिवशीच्या सुर्यास्ताप्रमाणेच, डोळ्यांचं पारणं फेडणारा, मनोहारी उगवता सूर्यही मनोहर गडावरून पाहिला. प्रजासत्ताक दिनी पहाटे गडाखालून अजूनही काही शिवप्रेमी गड चढत होते. कार्यक्रमासाठीची तयारी झाल्यानंतर सर्वजण ध्वजारोहणाच्या ठिकाणी जमलो. तरुण भारत चे श्री शेखर सामंत यांच्या हस्ते मनोहर गडावर तिरंगा डौलाने फडकला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आल्याने, मनाला झालेला तो आनंद खूप काही देऊन गेला. तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगित, ध्वजगित गायन झालं. मान्यवरांनी त्यांची मनोगतं मांडली. १७५ वर्षांनी हा दिन साजरा करता आला, त्याची खुण म्हणून १७५ फुगे आसमंतात सोडण्यात आले. त्यादिवशी पुन्हा मनसंतोष गडावर प्रस्तारोहण, व व्हॅली क्रॉसिंगची प्रात्यक्षिके शिवप्रेमींना देण्यात आली. त्यानंतर आम्ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला वंदन करून गडउतार होण्यास निघालो. वाटेत भेटलेल्या शिवप्रेमींना, वयस्कर आजी, आजोबांना गडउतार होण्यास मदत करत, त्यांचे आशीर्वाद घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. या ट्रेकचा, प्रजासत्ताक दिनाचा अनुभव मला घेता आला यासाठी माझा मित्र बाळा घावरेचे विशेष आभार.
सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लब व हिरकणी पथकासाठी गडाच्या पायथ्याशी गोठवेवासीयांकडून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली गेली होती. एकंदर
गोठवेवासीयांकडून आणि शिवापुरवासीयांकडून या संपुर्ण मोहिमेस मोलाचे हातभार लागले. अशीच कार्ये यापुढेही घडावीत ही सदिच्छा.
नितीन वराडकर
८०८०६५३६८६.
2 Comments
अशा काही गोष्टींचे साक्षीदार होणे भाग्याचेच असते
ReplyDeleteखूप छान नितीन....खरच खूप भाग्यच असते अश्या क्षणाचा अनुभव घेणं....
ReplyDelete