सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरापासून फक्त १.५ किलोमीटरच्या अंतरावर नदीपल्याड वसलेली ही शेर्ले गावची आरोसबाग वाडी. बांदा शहरात येण्यासाठी मात्र या वाडीतील लोकांना  ८ ते ९ किलोमीटरचा विळखा घालून येण्याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरा पक्का मार्ग नाही. पण हा पल्ला खुपच दूरवरचा व परीणामी खर्चिक असल्याने त्याला पर्यायी मार्ग म्हणून नदीतून होडीच्या सहाय्याने ही  लोकं अजूनही जिवघेणा प्रवास करत आहेत. या लोकांची शेतीही नदीपल्याड बांदा बाजूने, त्यामुळे शेतीकामासाठीही त्यांना होडीचाच आधार. तसेच जनावरांची ये जा करण्यासाठी पूर्वी नदीपात्राची रुंदी कमी असताना ही धाडसी लोकं नदीपात्रातुनच जनावरं नेत, जनावरं जात नसतील तर एखादी व्यक्ती जनावरांसोबत पोहत पोहत जनावरांना पैलतीरी नेऊन सोडे.

 
          वरच्या बाजूला डोंगर, खाली नदी आणि यामध्ये जवळपास साठ घरे वसलेली ही  आरोसबाग वाडी, पुर्वी बांदयामध्ये मुस्लिमांची राजवट असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने वसलेली स्थलांतरित लोकांची ही वस्ती, मुस्लिमांच्या उरूस या शब्दाने या वाडीचे नामकरण होऊन, कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन आरोस, आरोसबाग झालं असावं असं इथले जाणकार सांगतात. याठिकाणी मराठा, गाबीत आणि भंडारी अशा फक्त तीनच जातीच्या लोकांचा वावर असून ते एकमेकांच्या सहकार्याने, एकोप्याने राहतात, स्थलांतरित असल्याने त्यांची ग्रामदैवतं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.

           या वाडीतील शाळकरी मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण दरवर्षी पावसाळा व हिवाळा असे आठ महीने होडीने प्रवास करतात,  शाळा, कॉलेज, आरोग्य सुविधा बाजार यासाठी ही वाडी पूर्णपणे बांदयावरच अवलंबून आहे, ही होडीसेवा आरोसबाग ग्रामस्थांमार्फतच चालवली जाते, यासाठी कोणतेही इतर अर्थसहाय्य त्यांना मिळत नाही. पावसाळ्यामध्ये या लोकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे, दुथडी भरुन वाहणारया नदीतुन होडीने करावा लागणारा हा  प्रवास कधी जिवघेणा ठरेल याचा नेम नाही, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग अनुभवत असलेलं lockdown गेल्या कित्येक वर्षापासून आजतागायत आरोसबागवासीय पुरपरिस्थिती मध्ये अनुभवतायेत. उन्हाळ्याच्या चार महीन्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे निःसर्गतःच उपलब्ध असणाऱ्या दगड, बाम्बू, पोफळी, भेरला माड, व पाण्यात न कुजणाऱ्या धावशी नावाच्या वेलीपासून तात्पुरता साकव बांधतात व ये जा करण्यासाठी त्याचा वापर करतात.

          कालानुरूप मोठे झालेल्या नदीपात्रामुळे, नदी ओलांडण्याचा प्रवासही धोकादायक बनत चालला आहे, तसेच काही लोकांच्या मिळेल ते नदीत फेकून, नदीचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीमुळे, आयते खाद्य निर्माण झाल्याने नदीमध्ये मगरींचं प्रमाण वाढले आहे, त्यामुळे नदीमध्ये उतरून केली जाणारी मासेमारीही इथे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,  मगरींमुळे प्रवासही अजुनच धोकादायक बनला आहे.  वरच्या भागात नदीच्या उगमापासून ठिकठिकाणी शेतीसाठी लावलेले पाणीउपसा पंप, नदीकाठात खोदल्या गेलेल्या विहिरी तसेच छोटी छोटी धरणे यामुळे मार्च महिन्या दरम्यान प्रवाह संथ होतो, आणि खालच्या भागात हजारो, लाखो टन बेकायदेशीर होणाऱ्या वाळू उपसामुळे नदी पात्र खोल झाल्यामुळे समुद्राचे खारे पाणी नदीमध्ये घुसून मार्चनंतर नदीचे पाणी खराब होते त्यामुळे मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या या वाडीतील शेती करण्याचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. तसेच वाळूमाफियांच्या कृत्यामुळे, खोली वाढत जावून नदीच्या दुतर्फा असलेली शेतकऱ्यांची जमीन कोसळत चालली आहे, झाडे, माड नदीमध्ये कोसळून दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथला शेतकरी नुकसान सोसत आहे.  तसेच कोसळत जाणाऱ्या जमिनीमुळे होडी लावण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.

         नदीवर लवकर पूल व्हावा म्हणून आरोसबाग बांदा गावामध्ये समाविष्ट करण्यासाठीचेही प्रयत्न झाले, पण नदीमुळे निर्माण झालेल्या भौगोलिकतेच्या कारणास्त्व तोही प्रस्ताव नाकारण्यात आला. पुलासाठी अनेक आंदोलने आरोसबागतर्फे करण्यात आली, युतीशासनाच्या कालावधीत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते १९९९ साली याठिकाणी पुलाचं भूमिपूजन झालं होतं, पण नंतरच्या काळात सरकारमधे बदल झाल्यानं १५ वर्षे काँग्रेस राजवटीत या पुलाकडे कानाडोळा करण्यात आला. गेली कित्येक वर्षे आरोसबागवासीय पुलासाठी प्रयत्न करूनही पुलापासून वंचित आहे, व नैसर्गिक संकटाना तोंड देत आपला जिवनप्रवास करत आहेत. दोन वर्षापूर्वी पुन्हा युती शासनाच्या कालावधीत पुलाचं काम हाती घेण्यात आलं,  फक्त गावजोडणीसाठी साधा पूल हवा असणाऱ्या आरोसबागवासीयांना खाडीचे निकष लावून मोठा पूल मंजूर करण्यात आला, तो बदलून साध्या पुलासाठी प्रस्ताव दिला असता त्याला आणखी दोन वर्षे जातील, असं कळल्याने, मिळेल तो पूल पदरी पाडून घेण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन मार्फत हे काम चालू आहे, सद्यस्थितीमध्ये तेही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे आरोसबाग वासीयांचा खडतर प्रवास अजूनही संपलेला नाही, सदर पुलाबाबत प्रशासनाने जातिनिशी दखल घेऊन लवकरात लवकर पूल पूर्णत्वास न्यावा, व आरोसबाग वासियांच्या समस्या खंडित कराव्यात हिच अपेक्षा. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यास आम्हीही इच्छूक आहोत.

      जिवावर उदार होवून लोकांना होडीच्या सहाय्याने पैलतिरावर नेवून सोडणाऱ्या या नावाडयांस आमचा सलाम.
धन्यवाद.