लिहायचे किडे "

डावीकडून मागची पहिली व्यक्ति .."पुढारी"


लेखाच्या शिर्षकावरून वाचकांना असं वाटणं साहजिक आहे, की हा लेख राजकीय व्यक्तीशी निगडित असावा. पण आमच्या या व्यक्तीचा तसा काही अजूनतरी दूरदूरपर्यंत संबंध नाही, भूतकाळामध्ये, फक्त दैनिक पुढरीमध्ये ही व्यक्ती कार्यरत असल्याने त्याचे नामकरण पुढारी असे झाले. हा लेख राजकारणाशी संबंधित असावा म्हणून जर कोणी वाचत असेल तर त्याची निराशा होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण.

        आमचा पुढारी नोकरदार असल्याने फक्त रविवार हा दिवस राखीव. तशी सक्त ताकीदही, की एखादी ट्रिप अरेंज करायची असल्यास फक्त रविवारचाच विचार करावा, तसं आम्हालाही ते शक्य होतं, कारण आमचे जवळपास सर्वच सदस्य नोकरदार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्षेत्रातील कंपन्यानी कामगारांकडून कमी पगारामध्ये जास्तीत जास्त काम करून घेण्याचे तंत्र अवलंबिले, त्याचा फटका या पुढारीला बसला. आणि व्यवसायिक म्हणून कधिही न चिंतीलेला पुढारी व्यवसायिक बनला. त्याचबरोबर त्याच्या दैनंदिन जीवनाचे नियम बदलले. एरव्ही रविवारी फ्री असलेला पुढारी रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने रविवार सोडून बोला असं म्हणू लागला. पण तसं करणं इतर सदस्यांचा विचार करता आम्हाला सहज शक्य होणारं नाही.

त्यादिवशी म्हणजेच शुक्रवारी सहलीच्या फक्त दोन दिवस आधी. या पुढारीचा फोन आला. रविवारी कुठेतरी फिरायला जायचं का? असा प्रश्न.... मी ही आच्छर्यचकित, सकाळी सूर्य उगवताना तो नक्की कुठल्या दिशेने उगवला होता त्याचा विचार करू लागलो. पण पुढे बोलताना त्या रविवारी व्यापारी मेळावा असल्याचे कळले. त्यामुळे व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने बाजार बंद राहणार असल्याने दुकान बंद ठेवावे लागणार होते. आणि म्हणूनच कुठल्याही रविवारी न भेटणारा आमचा हा पुढारी त्या रविवारी रिकामी भेटला. आणि सहलीचं आयोजन करण्यास धजाऊ लागला. पण असं अचानक एखादा प्लान केल्यानंतर त्यासाठी कितीजण राजी होतील, याबद्दल मी तरी साशंक होतो. म्हणून पुढारी सोबतच आमच्या सर्व सदस्यांपैकी प्रत्येकाला कॉन्फरंस कॉल वर घेवून पुढारीनाच विचारणा करायला लावली. आणि सुदैवाने आमचा फक्त एक सदस्य सोडला तर कुणाकडूनच नकार ऐकू आला नाही. पण हे सर्व करत असताना आमच्या एका सदस्याकडून रविवारी संकष्टी असल्याचे कळले. आणि पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण इच्छित कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यादिवशी शाकाहारी जेवणाचा बेत करायचा असे निच्छित करून कोंडूरा बीच येथे जाण्यासाठी सहलीचे आयोजन करण्याचे ठरविले.

रात्री लगेच व्हाट्सएप ग्रुपवर सहलीबद्दलच्या सूचना व इतर माहिती पोस्ट केली. आमचे सर्व सदस्य सावंतवाड़ी आणि दोडामार्ग मधील त्यामुळे सर्वानी ठरलेल्या वेळी मळगाव येथे जमावे असे ठरले. लागणारया सर्व सामानाची खरेदी रविवारी मार्केट बंद राहणार असल्याने सहलीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी करून ठेवली. आणि रविवारचा दिवस उजडला.

प्रस्थान...

सर्व सदस्यांनी मळगाव येथून एकत्रितपणे कोंडुऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. त्या दिवशी पोलिओचा डोस असल्याने काही सदस्य सकाळी लवकर उठून त्यांच्या पाल्यांना डोस पाजून आले होते. कोंडुरा इथे पोहोचल्यावर तिथे असलेल्या पांडवकालीन मंदिराच्या इथे जत्रेसाठी होणारी लगबग आम्हाला दिसली. मंदिराभोवती मंडप व सुशोभिकरण करण्यात येत होते. एका ठिकाणी चूल मांडून जेवणाच्या तयारीला लागलो. कोंडुऱ्याच्या या डोंगरावरच महेश दादाचं घर आहे, त्याच्या घरी गेलो तर महेश दादा नव्हता. काकूंकडून पाणी भरून कळशी, लाइफ जॅकेट व रिंग घेऊन मी आमच्या ठिकाणावर पोचलो. आजपर्यंतच्या केलेल्या कॅम्पिंगमधील हे पहिलंच कॅम्पिंग होतं ज्यामध्ये आम्ही शाकाहारी जेवण बनवत होतो.



जेवण केल्यानंतर आमची पाऊले किनाऱ्यावर पडली, त्याचवेळी एक मध्यम आकाराचा मृत मासा लाटांबरोबर किनाऱ्यावर आला. त्या मेलेल्या मढ्यासोबत फोटो काढण्याचा शौकही आमच्यातील बहुतेकजणांना आवरता आला नाही. किनाऱ्यावर आमच्या एकूण चौदा सदस्यांच्या दोन टीम करून क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेतला, मी यापूर्वी शेवटचं क्रिकेट कधी खेळलेलो काय माहीत, पण त्यादिवशी खेळताना खुप मजा आली. भरल्या पोटी क्रिकेट खेळल्याने थोडी दमछाक झाली होती. आता पुढचा प्लान होता समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचा. आमचे काही सदस्य एकमेकांना ओढत पाण्यात घेऊन जाण्याचा खेळ करू लागले. बराच वेळ पाण्यामध्ये डुबलो, लाईफ जॅकेट व रिंगच्या मदतीने लाटांवर स्वार झालो. सूर्य जसजसा अस्ताला येऊ लागला तसे आम्ही पाण्यातून बाहेर पडलो.

सर्व आवराआवर करून, महेश दादाच्या घरच्यांचा निरोप घेऊन मग आम्ही परतीला निघालो. कोंडुऱ्याचा डोंगर चढून वर येतो, तोच सकाळी आमच्यासोबत येत असणारा आमचा एक सदस्य आम्ही घरी जायच्या वेळेस तिथे आलेला होता. आमच्यासोबत थोड्या गप्पा मारून, सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो काढल्यानंतर आमच्याऐवजी तोच आम्हाला सांगू लागला. "काय पण सांगा तुम्ही पण खूप मजा इली" आता जायच्या वेळेस येऊन याला काय मजा आली हा आम्हा सर्वांना पडलेला प्रश्न. त्यादिवशीची उत्सवमूर्ती म्हणून गणल्या गेलेल्या पुढारिंच्या आग्रहास्तव आयोजित केलेल्या या सहलीचा आमच्या प्रत्येक सदस्यांने मनसोक्त आनंद लुटला. तिथून वेंगुर्ला इथे पोचल्यावर चहा पिऊन आम्ही सर्वजण घरच्या दिशेने निघालो. घरी पोचेपर्यंत तर अंधार पडला होता.