महर्षि व्यासांनुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ही चार युगं.
हे युग यापैकी नाही. पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युगं विटेवर उभा आहे, हे युग त्यापैकीही नाही. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी नक्की कुठल्या युगाबद्दल बोलतोय! "कोरोनायुग" हो युगच म्हणावं लागेल कारण आजपर्यत एखाद्या आजारासाठी पूर्ण जग बंद रहावं असं कधी झालं नाही, आता कोरोनाबद्दल बोलण्यामागचं कारण काय असावं बरं! तर तुम्हाला माहीतच असेल की दळणवळणाची साधनं बंद केल्यामुळे वर्क फ्रॉम होम ची संकल्पना जोर धरू लागली त्याप्रमाणे इतरही कामे डिजिटल पद्धतीने होऊ लागली. आणि छोट्या दोस्तांसाठी महत्वाचं म्हणजे शाळाही घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या. आता हे शिक्षण मुलांपर्यंत किती प्रमाणात पोहोचते ठाऊक नाही, दुर्गम भागात इंटरनेट सुविधांचा अभाव, तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात स्मार्टफोन असावा अशातला भाग नाही, त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडसर येत आहे. काही ठिकाणी उंच भागात नेटवर्क मिळतं म्हणून, गावातल्या डोंगरावर ग्रामस्थांकडून तात्पुरता तंबू ठोकून त्याठिकाणी शाळा भरवली जातेय. काही अंशी विद्यार्थ्यांनी हे स्कूल फ्रॉम होम सकारात्मकतेने घेतले आहे यात शंका नाही. पण तितकेच शाळेतल्या मजेपासून त्यांना अलिप्त रहावे लागत आहे हेही खरे.
आजचा माझा हा ब्लॉग याच छोट्या दोस्तांसाठी एक शाळेतली गम्मत घेऊन.... शाळेची शैक्षणिक सहल....
शाळा, वर्ग चालू होता, वर्गशिक्षक भूगोलाचा अभ्यास घेत होते, अचानक शाळेचे शिपाई हातात नोटीस वही घेऊन आले, त्यांना पाहताच वर्गातील सर्व मुलांनी डोळे टवकारले, व कुतुहुलाने सरांकडे पाहू लागले. सरांनी नोटीस वही हातात घेऊन नोटीस वाचायला सुरवात केली.
शालेय वर्ष २०१९ - २०, आपल्या शाळेची यंदाची शैक्षणिक सहल, दिनांक ३ व ४ जानेवारी २०२० रोजी कोल्हापूर येथे नेण्याचे योजिले आहे, इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव वर्गशिक्षकांकडे दयावे. सर्वजण प्रफुल्लित नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. आणि उत्सुकता सुरू झाली ती कोणकोण सहलीला जाणार याची विचारपूस करण्याची. नम्रता यंदा दहावीला, म्हणजेच शालेय शेवटचं वर्ष असल्याने तिने सहलीला जायचे ठरविले, तसं वर्गातील बऱ्याच जणांचं हेच मत होतं, त्यामुळे बरीच मुलं सहलीला जाण्यास तयार झाली.
जसजसा सहलीचा दिवस जवळ येत होता, तसतशी मुलांची उत्सुकता वाढत होती, सहलीच्या आदल्या दिवशीच नम्रताने सर्व तयारी करून ठेवली होती. म्हणजे दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये फक्त जेवणाचा डब्बा भरो और निकल पडो एवढंच करायचं होत.
झालं, सहलीचा दिवस उजाडला भल्या पहाटे उठून घरातून निघण्यासाठी ती तयार झाली, आईने लवकर उठून जेवण बनवून डब्बा भरून ठेवला होता, आता जबाबदारी होती ती पप्पांची, तीला शाळेपर्यंत सोडण्याची. तशी ती निघाली, शाळेत पोहोचलीही.
शाळेचे शिक्षक हजर होतेच, बाकी मुलंही जमलेली, सहलीसाठी ठरविलेल्या बस पण आल्या होत्या, पण बिथरलेल्या अवस्थेमध्ये नम्रताची नजर कुणालातरी शोधत होती, घोळक्यामधे विचारपुस करत होती. तिची अत्यंत जवळची मैत्रिण साक्षी अजून पोहोचलीच नव्हती, थोड्या वेळाने हातात बॅग घेऊन साक्षीच मुलांच्या घोळक्यामधून नम्रताला शोधत शोधत तिच्यापर्यंत आली, तसा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघीही एकमेकांना घट्ट बिलगून बसमध्ये जाऊन बसल्या, व बस सुटण्याची वाट पाहू लागल्या.
शिक्षकांच्या सहलीसंबंधीच्या औपचारिकता आटोपल्यावर, बस सावंतवाडीच्या मार्गाने कोल्हापूरच्या दिशेने निघाली. बस निघताच मुलांनी एकच कल्ला केला. मग काय, मजा, मस्ती, गप्पा, गाणी गात मुलांचा प्रवास सुरू झाला. सकाळच्या वेळचं सावंतवाडीच्या मोती तलावाभोवतालचं ते विहंगम दृश्य बघून मुलांना अजूनच हुरूप आला. नम्रता आणि तिची जिवलग मैत्रिण एकाच सीट वर, त्यामुळे त्यापण मज्जा करत होत्याच, सावंतवाडीच्या प्रसिद्ध जिमखाना मैदानाच्या थोडं पुढे आल्यावर साक्षीची नजर खिडकीबाहेर गेली. ती नम्रताला म्हणाली, अगं हे बघ इकडे बघ! नम्रता बाहेर बघते तर तिला धोतर नेसलेली खांद्यावर घोंगडी घेऊन उभी असलेली, डोक्यावर नागफणा असलेली उभी मूर्ती दिसली. अगं ते उपरलकर देवस्थान आहे. अख्खी सावंतवाडी पालथी घालून, सावंतवाडीची खडानखडा माहीती असल्याच्या अविर्भावात तिने साक्षीला सांगितले. बसमधूनच त्यांनी देवाला हात जोडले.
आंबोली घाटातील तो अनुभव, आनंद तिथली द्रुश्ये पाहुन पैसा वसूल झाल्याच्या अविर्भावात सहलीचा आनंद द्विगुणीत करुन सर्वजण गाड़ीत बसले आणि बस निघाली ती पुढच्या क्षणांचा आनंद लूटण्यासाठी थेट कोल्हापुर च्या दिशेने..
(कल्पनाविलास)
4 Comments
Suprb nitin
ReplyDeleteThank you
DeleteSundar
ReplyDeleteThank you
Delete