Google map survey

     आजपर्यंत आपण अभिमानानं सांगत आलोय, #स्वर्गीय कोकण,  #कोकणासारखी हिरवळ शोधून सापडणार नाय,  #स्वप्नातलं गाव. कोकणच्या सौंदर्याला अधोरेखीत करण्यासाठी अशी बरीच विशेषण आपण सऱ्हासपणे वापरतो.
         
        कोकणच्या विकासाच्या नावाखाली बेसूमार वाढत चाललेली वृक्षतोड, मायनिंग, क्रशर कंपन्या, लाकूड व्यापारी स्थानिक कोकणी माणसाला फसवत, जमिनी लुबाडत ईकोसेन्सीटीव्हला विरोध करत खोरयानं पैसा ओढत आहेत. आणि आमचा कोकणी माणूस जमिनी विकून आलेल्या पैशावर पोट भरतोय. ज्या निसर्गानं आपल्या आजपर्यंतच्या पिढया जगवल्या तोच निसर्ग नष्ट करुन आपण जगलो तर पुढच्या पिढीचं काय? याचा विचार होणे अत्यंत महत्वाचे आहे.

      
         ईकोसेन्सीटीव्हला विरोध करत निसर्गाला बाधा पोहोचवत केलेल्या कामांना जर तुम्ही विकास म्हणत असाल तर तो खरा विकास नाहीच मुळी. “जागतिक पातळीवर जरी निसर्गाला पुरक विकासाचं मॉडेल बनवायचं झालं तरी ते नव्याने बनवण्याची गरज नाही, आमचं कोकण शाश्वतः विकसित आहे.” ज्याची आम्हाला कदर नाही.
       
        निसर्गातील जैवविविधता नष्ट करुन डोंगरावर रबर प्लांटेशन आणि अननसाचे मळे तयार केलेल्या केरळमध्ये मागच्याच वर्षीच्या प्रलयानं काय झालं ते आपण पाहीलं, तीच परिस्थिती आम्हाला कोकणात पहायचीय का? विदर्भ मराठवाडयात दुष्काळ पडल्यानंतर शेतीचं काय होतं? जनावरांचं काय होतं? दोन हंडे डोक्यावर घेवुन पाण्यासाठी वणवण फिरणारया आया, बहीणी आम्हाला कोकणात बघायच्या आहेत का? असे असंख्य प्रश्न उद्या निर्माण होतील.
       
        जैवविवीधतेने नटलेल्या आमच्या याच जंगलात वड, पिंपळ, ऐन, किंजळ, हेरडा, बेहडा,कांचन, हेळा कुडा, रानभेंडी, बाभूळ, गुंज, नाना, जांभा, शेवरी, अडुळसा, पळस यासारखी महत्त्वाची, आणि काही औषधीदृष्टय़ा वापरात असलेली, चारा, करवंद, पेरू, चाफरा, जांभूळ, चुरना यासारखी फळझाड़े आढळतात. आंबा, काजुच्या बागा, माडा, पोफळीच्या राया, कोकम ही झाडे आम्हाला भरभरून देत आली आहेत. शहरी भागात एका भांडयात पाणी ओतून त्यात झाड ठेवून त्याला मनिप्लांट संबोधणारयांनो हेच आमचे खरे मनिप्लांट आहेत.
       
        चार वर्षात सोळाशे एकर जंगलक्षेत्र कापलं गेलं. अशीच परिस्थिती कायम राहिली तर येणारी पिढी #कोकणासारखी हिरवळ शोधून सापडणार नाय असे अभिमानानं सांगु शकेल काय? यावर वेळीच आळा घालून निसर्गपुरक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा तुमचं सत्यातलं समृद्ध गाव कधी स्वप्नात हरवून जाईल ते तुम्हालाच कळणार नाही.