लिहायचे किडे "


  त्यादिवशी कोल्हापूरला जायचा योग आला, आमच्या शेजारचाच मित्र रूपेश याच्या महत्त्वाच्या कामासाठी त्याला सोबत म्हणून कोल्हापूरला जायचं ठरलं होतं. तसा मीही आस्तिकच, पण नित्यनियमाने देवपूजा वैगेरे अशा गोष्टींपासून थोडा दूर. तो निस्सीम दत्तभक्त असल्याने गुरुवार हा गुरुदत्ताचा वार, चांगला दिवस असं योजून त्या दिवशी निघू असं त्याचं म्हणणं होतं. त्यानुसार त्याच्या बाईकने, घरातून सकाळी लवकर निघून संध्याकाळी घरी परतू, असा विचार होता.


ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी घरातून सहा वाजता निघण्याऐवजी रुपेशच्या अलार्म सेट करण्याच्या गडबडीमुळे एक तास उशिरा म्हणजे सात वाजता निघालो. सावंतवाडीपासून आंबोलीमार्गे आजऱ्यामध्ये पोहोचलो तेव्हा दहा वाजले होते. अलिकडच्या काळात माझ्या कोल्हापूर वाऱ्या झालेल्या असल्याने आजरा बस स्टँड च्या समोरचं, नाश्ता करण्यासाठी उत्तम असलेलं "नैनिताल हॉटेल" मला माहीत झालं होतं, येथे उत्तम प्रतीचा नाश्ता मिळतो. आपलाही कधी अजऱ्यात जायचा योग आला तर या हॉटेलमध्ये नाश्त्याचा आस्वाद नक्की घ्या. थंडीच्या दिवसात बाईकवरून प्रवास झाल्याने ऑर्डर केलेल्या पुरी भाजीचा घास घेताना हात जड झाल्यासारखा वाटत होता. नाश्ता केल्यानंतर आजऱ्यातुन निपाणीमार्गे हायवेने थेट कोल्हापूर गाठलं. रस्ता शोधण्यासाठी Googal Map चा वापर करून कामाच्या ठिकाणी पोहोचलो.


नियोजित काम पूर्ण होईपर्यंत अडीज वाजून गेले होते. निघताना, सहजच थांबुया का रे आज? असा प्रश्न रूपेशला विचारला. तोही त्याच्या मनातलं बाहेर काढून घेतल्यासारखा लगेचच होकारार्थी बोलता झाला, आणि नरसोबाच्या वाडीला दत्तदर्शनाला जाऊ, तिथे रहायची वैगेरे पण सोय होईल असं बोलला. अनपेक्षितपणे आलेला दत्तदर्शनाचा योग का टाळावा? असा मनाचा कौल घेऊन कोल्हापूरहून मिरज रोडने नरसोबाच्या वाडीच्या दिशेने प्रयाण केले. वाटेतच असलेल्या "सरपंच हॉटेल" (कोल्हापूर-सांगली हायवे, हेरले) मध्ये त्या हॉटेलची खासियत असलेल्या "सरपंच स्पेशल डिश" वर ताव मारून जेवणाचा आस्वाद घेतला. इथल्या आदरातिथ्या सोबतच इथल्या जेवणाचा दर्जाही उत्तम होता. जेवण झाल्यानंतर साधारण पाच वाजण्याच्या सुमारास नरसोबाच्या वाडीला पोहोचलो.


रूपेश अलिकडेच सपत्नीक याठिकाणी येऊन गेला होता, त्यामुळे राहण्याच्या व्यवस्थेबद्दल त्याला माहिती होती. त्यादिवशीची रात्र तिथे काढायची असल्याने सर्वप्रथम राहायची तजविज केली. ज्या कामानिमित्त कोल्हापूरला आलेलो, त्याव्यतिरिक्त दुसरं कोणतंच नियोजन नसल्याने रूपेशजवळ असलेली छोटी बॅग सोडली तर अतिरिक्त कपडे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सामान बरोबर नव्हतं. तीच बॅग व पायातल्या चपला रूममध्ये ठेवून अनवाणी पायांनी कृष्णेच्या काठी पोहोचलो. मंदीर परिसरात भाविकांची गर्दी होती. दर्शनासाठीची रांग पण खूपच मोठी होती. तसंही आजचा दिवस आम्ही तिथे राहणार असल्याने दर्शनाची घाई नव्हती, त्यामुळे प्रथम मंदिर परिसरात फिरलो. दर्शनासाठीची रांग थोडी तोकडी झाल्यावर "नृसिंहसरस्वतींचे" दर्शन घेतलं. अलिकडे "वासुदेवानंद सारस्वतींच टेंबे स्वामी महाराजांचं" "येरे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या" हे गीत कानात आणि त्याबरोबर ओठात असायचं, आज अनपेक्षित योगानं या कृष्णातिरीच्या वसणाऱ्याकडेच मी आलो होतो. अंधार पडेपर्यंत कृष्णातिरावरील पायऱ्यांवर कृष्णेच्या पात्रात पाय ठेवून बराच वेळ घालवला. त्यानंतर आठ वाजता दत्त महाराजांच्या पालखीची अनुभुती घेतली. साडेनऊ वाजता राहायच्या ठिकाणी तिथल्या जेवणाचा लाभ घेतला आणि काही वेळानंतर झोपी गेलो.



दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठलो, प्रातःविधी उरकून बाहेर पडलो. मंदिराच्या दिशेने वाटेत असलेल्या बस डेपो च्या मैदानातून चालताना डांबरावरील बारीक खडीचे कण थंडीने आखुडलेल्या पायांना टोचत होते. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा प्रातःस्नानासाठी एक दोन माणसेच आली होती. विजेच्या दिव्यांचा प्रकाश सोडला तर कृष्णेच्या पलिकडच्या तिरावरचं काहीच दिसत नव्हतं, तिच्या पात्रामध्ये अगदी समोरचंही काही दिसत नव्हतं, त्यामुळे कृष्णेमध्ये डुबकी मारण्याची खूप इच्छा होती पण धीर झाला नाही. पायरीवरच बसून स्नान उरकले. तोवर सकाळची आरती चालू झाली होती. मंदिराजवळ आल्यावर नृसिंहसरस्वतींसमोर साष्टांग नमस्कार घातला, कृष्णेच्या तिरावर आरतीचा घुमलेला नाद ऐकून मन प्रफुल्लित झालं होतं. आरती झाल्यावर बराच वेळ मंत्रोच्चारामध्ये चाललेला पादुकाभिषेक पहिला. पादुकांसमोर पुन्हा नतमस्तक होऊन प्रदक्षिणा घातल्या. थोडा वेळ तिथेच व्यतीत करून राहायच्या ठिकाणी पोहोचलो.

परतीचा पल्ला गाठायचा होता म्हणून रूम आवरून चावी परत करण्यासाठी रिसेप्शनला आलो, तर तिथे कोणीच नसल्याने थांबावं लागलं. त्याच वेळी गोव्यातील एक व्यक्ती आम्हाला तिथे भेटली, त्यांच्या लोभस स्वभावामुळे बराच वेळ त्यांच्याशी बोलत राहिलो, चावी देण्यासाठी कोणीतरी येईपर्यंत पुन्हा मंदिराजवळ फेरफटका मारु असा विचार करून तिघेही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मंदिराजवळ पोहोचताच पाहतो तर काय कृष्णेच्या पात्रात स्नान करणाऱ्या भक्तांची संख्या वाढली होती आणि त्यातले काहीजण पाण्यात डुबकी मारत होते. नदीपात्रात डुबकी मारणाऱ्या त्या भक्तांना पाहून मलाही तो मोह आवरता आला नाही, मग काय पुनःच्छ पाण्यात उतरलो. मघाशी आलो तेव्हा अंधारामुळे काही दिसत नव्हतं तर आता दाट धुक्यामुळे. चावी परत करण्यासाठी झालेला विलंब पथ्यावर पडल्याने पोहण्याचाही आनंद घेता आला. म्हणतात ना तीव्र इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, अगदी तसंच झालं. निघताना पुन्हा पादुकांचं दर्शन घेतलं, दर्शनाच्या रांगेमध्येच आमच्या समोरच एक गरीब व्यक्ती दर्शन घेत होती. साधासा पोशाख, शर्ट काही ठिकाणी फाटलेला, त्यांना पाहताच माझ्याऐवजी त्यांच्यासाठीच प्रार्थनारुपी विचार मनाला शिवून गेले. ज्याठिकाणी रात्रीचा मुक्काम केला तिथल्या रहायच्या व्यवस्थेचाही मी मुद्दामहून उल्लेख करेन, उत्तम आदरातिथ्य, राहायची व्यवस्था आणि जेवणही, या सगळ्याचा योग्य मोबदलाही ते सांगत नाहीत, आपण देऊ ती रक्कम गोड मानून स्विकारतात. अधिकारी व्यक्तीकडे चावी देऊन, त्यांच्याशी थोडा वार्तालाप करून, सर्वांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.


परतीच्या प्रवासामध्ये कणेरी मठाला भेट देऊन पुढे अदमापूरला बाळूमामांचं दर्शन घेवून सावंतवाडी गाठावी असा विचार करून, "बोरेगाव-हेरवाड-कुरुंदवाड रोडने" कणेरीच्या दिशेने निघालो, सकाळच्या वेळी पडलेल्या दाट धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे बाईकचा वेग कमी होता. धुक्यामुळे आंगावर पाणीही जमा झालं होतं. साडे नऊ च्या सुमारास कणेरी येथे पोहोचलो, कणेरी मठातील अतिप्राचीन मंदिरात शंभू महादेवाचं दर्शन घेतलं, शंभू महादेवाचं हे मंदिर काळ्या दगडापासून बांधलेलं असून त्याच्या खास बांधकामशैलीमुळे अजूनही सुस्थितीत आहे, संपुर्ण मठामध्ये बऱ्याच पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. मठाच्या परिसरात थोडा फिरून झाल्यावर अदमापूर गाठलं. बाळूमामांचं दर्शन घेतलं, कपाळी भंडारा चढला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलींमुळे मंदिर परिसर फिरत आला नाही. साडे अकराच्या सुमारास तिथून आम्ही गारगोटीमार्गे सावंतवाडीच्या दिशेने निघालो.

आंबोलीत पोहोचलो तेव्हा दीड वाजून गेले होते. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे पोटपूजा करण्यासाठी आंबोलीतील "स्वाद हॉटेल" मध्ये थांबलो, घरी गेल्यानंतर जेवण करणारच होतो, तोपर्यंत काही तरी पोटात ढकलू म्हणून तिथे थोडं चायनीज खाल्लं. तेही उत्तमच होतं, पून्हा भेट द्यावी असं. संपुर्ण प्रवासामध्ये जेवणाबाबतच्या आलेल्या चांगल्या अनुभवामुळे त्यासंबंधीच्या नोंदी मुद्दामहुन नमूद केल्या आहेत. आंबोलीहून निघाल्यानंतर आमची बाईक पोहोचली ती थेट आमच्या घरापर्यंत.

||अजि म्या धन्य जाहलो||