" लिहायचे किडे "
अगदी सुरवातीलाच सांगायचं झालं तर मी काही लेखक वैगेरे नाही. विचारवंतही नव्हे. आयुष्यात पुढे पुढे जात असताना जे जगणं जगतो, शिकतो, अनुभवतो त्यातलं काहीसं लेखणीत उतरंवावसं वाटतं एवढंच. साधारणपणे कोणतीही गोष्ट लेखणीतून उतरवायची असेल तर त्यासाठी वाचन महत्वपुर्ण ठरते. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं वाचन खूपच तुटपुंज्या स्वरूपातलं, अगदीच शून्य म्हटलं तरीही वावगं नाही. म्हणजेच मी वाचनाआधी लिहायला सुरवात केली, याचं एकमेव कारण म्हणजे या लेखाचं शीर्षक.
लिहायची सुरवात खरं तर मित्र परिवारातील काही निवडक मित्रांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ स्तुतीसुमने उधळण्याच्या निमित्ताने झाली. यामध्ये फक्त स्तुतीसुमने नसून थोडा खोचकपणाही असायचा. त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादाने लिहायची ओढ वाढत गेली. नंतर पुढे नव्याने विषय सापडत गेले आणि त्याचं लेखात रूपांतर करता आलं. कोणतेही विशेष वाचन नसताना हे घडत गेलं. वाचन झालं ते शालेय जीवनात, आणि त्यानंतर वर्तमानपत्रातून. ब्लॉग ला सुरवात करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या साहित्याचं वाचन केलेलं नव्हतं. पण माझ्याकडील शब्दसंग्रहामध्ये भर पडली ती वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवण्याच्या सवयीमुळे. अलीकडच्या काही वर्षात "तरुण भारत" हे वृत्तपत्र नेहमी घरी असायचे. त्यातली कोडी सोडवायचो. त्या आधी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १ रुपयात, "मुंबई चौफेर" या वृत्तपत्राची प्रत मिळायची. या वृत्तपत्रात दोन मोठी शब्दकोडी असायची. संपूर्ण कोडं सोडवून पाठवणाऱ्या नशीबवान व्यक्तीला "मिक्सर" बक्षीस होतं. स्वस्त असल्याने निव्वळ शब्दकोड्यांसाठी हे वृत्तपत्र विकत घ्यायचो, आणि त्यातली शब्दकोडी सोडवायचो. त्यातून अनेक शब्द नजरेखालून गेले.
रोजगार मिळवणे हा आपल्या सर्वांचाच मुख्य उद्देश असतो. आपलं शिक्षणही त्यासाठीच झालेलं असतं. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून आपले पालक आपल्याला शिक्षण देत असतात, शिक्षणाकडून ही एकच अपेक्षा केली जाते. रोजगार मिळवण्याबरोबरच आपल्या आवडी निवडी, कला जोपासण्यासाठीही माणूस प्रयत्नशील असतो. मी ही या दोन गोष्टींसाठी जीवनाशी संघर्ष करतोय. पण आर्थिक सुबत्ता आणि कला जोपासणे या दोन्हीचा ताळमेळ घालताना मन चंचल होतं, भरकटतं, त्यातून होणारा त्रास नकोसा वाटतो. खरं तर आपण ज्यावेळी संघर्ष करतो त्याचवेळी त्यातून काहीतरी नवीन शिकत असतो. त्यातून जरी रोजगार निर्माण होत नसला तरी येणाऱ्या अनुभवातून आपल्यातील शिकाऊ वृत्तीमुळे आपण प्रगल्भ होत असतो.
नवा आनंद मिळवण्यासाठी केलेले उपक्रम असोत वा गडभ्रमंती किंवा इतर सहली असोत, त्यातून आनंद मिळतो, आलेले चांगले वाईट अनुभव कामी येतात. आणि लिहू लागतो. ब्लॉग ची सुरवात, हेच अनुभव लेखणीतून उतरवण्यापासून झाली. लिहायला लागल्यानंतर वाचनही महत्वपूर्ण आहे असं वाटू लागलं, त्यामुळे वाचन करायला लागलो. वाचताना आधी झोप यायची, आता वाचन ही आवड बनली आहे. वाचनामुळे नव्या गोष्टी ज्ञात होतात. प्रत्येक लेखकाची वाक्य रूपांतरीत करण्याची पद्धत, संदर्भ, विशेषणे कळतात, नवे विषयही सापडत जातात. जसजसा लिहीत जातो तस तसा शब्दसंग्रहही वाढत जातो.
कोणताही लेख लिहिताना मी वही, पेन चा वापर करत नाही. एखाद वेळा तसा प्रयत्न केला होता, पण होणारी खाडाखोड पाहता डिजिटल पर्याय उत्तम वाटू लागला. त्यामुळे मोबाईलवरच Googal Keep या App मध्ये लिहितो. (Type करतो). एखादं वाक्य लिहिल्यानंतर शब्दप्रयोग बदलायचे असल्यास, वाक्यांचा क्रम मागे पुढे करायचा असल्यास किंवा परिच्छेद मागे पुढे करायचे असल्यास ते मोबाईलमध्ये सोपे जाते. कागदावर होणारी खाडाखोड टाळता येते. लिहिलेलं सुटसुटीत वाटत असल्याने पुन्हा पुन्हा वाचून त्यात योग्य ते बदल करावयाचे असल्यास सहज करता येतात, व मजकूर अंतिम करता येतो.
प्रत्येक लेखासंदर्भातील आपली प्रतिक्रिया कृपया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा, आपल्या प्रतिक्रियांचा मी जाणीवपूर्वक विचार करेन. काही विषयांबाबत लिहावंसं वाटतं, परंतु अभ्यास तोकडा पडतो, असे विषय जाणीवपूर्वक टाळतो. ज्यातलं कळतं, उमगतं तेवढंच लिहिण्याचा खटाटोप करतो. लेखनाची आवड आधी निर्माण झाली, त्यानंतर लेखनामुळे वाचनाची. आता एखादं पुस्तक कायम हातात असावसं वाटतं. वेळ मिळेल तसं वाचन होतं. एखादा विषय सापडला की या लेखाच्या शिर्षकाप्रमाणे अंगातील "लिहायचे किडे" जागृत होतात, लिहू वाटतं, एखादा विषय लिहायला घेतला, कि आपसूक सुचत जातं, जे सुचतं तेच शब्दात उमटतं त्यातूनच एखादा लेख तयार होतो.
2 Comments
छान👍
ReplyDeleteThank you
Delete