" लिहायचे किडे "
यंदाचा उन्हाळा खूपच उष्णतेचा गेला, उकाड्याने पूर्ण हैराण व्हायला झालं होतं, मध्यंतरी वैभव सोबत फुकेरी येथील हनुमंत गडावर एक ट्रेक केला होता, आणि खाली उतल्यानंतर तेथील रजिंगणच्या इथे पोहण्याचा आनंद घेतला होता. मी याआधीही येथे, असाच सेम ट्रेक केला होता, त्याचाही अनुभव या ब्लॉग वर वाचायला मिळेल. त्यानंतर एकदा देवगड गेलेलो त्यावेळी छोट्या दोस्तांसोबत समुद्राच्या लाटांवर स्वार झालो होतो. पण अजून दोन ठिकाणी जावं असं खूप वाटत होतं. एक म्हणजे शिरशिंगेच्या डोंगरातून मार्ग असणारं गंगोत्री आणि शिरवलच्या नदीतील रांजण खळगे. तसं नियोजन करण्यासही धडपडत होतो पण योग येत नव्हता. त्यांसंबंधी वैभवला बोललेलोही, पण तो त्याच्या कामासाठी पुण्याला जाणार होता आणि अलिकडे दोन दिवस पाऊसही पडत होता त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाणं आता बहुधा पावसानंतरच होईल, असं चित्र होतं. त्यातल्या एका ठिकाणी जाण्याचा योग आला, त्याचा अनुभव आजच्या लेखात मांडतोय.
शनिवारी सहज वैभवला मॅसेज केला, त्यावेळी तो ऑफ लाईन होता, त्याचा रिप्लाय न आल्याने मीही थोड्या वेळाने झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आरामात उठलो. मोबाईल चेक केला तर वैभवने रिप्लाय दिलेला होता, तेव्हा असं समजलं की, त्याच्या बाइकला काहीतरी प्रॉब्लेम झाल्याने तो पुण्याला गेलेलाच नाही, मग काय लगेच नियोजनास सुरवात झाली, त्यात आजचा दिवस शिरवलच्या नदीची सफर करण्याचे निच्छित झाले. लगेच आवराआवर केली, नाश्ता केल्यानंतर बॅग भरुन घरातून बाहेर पडण्यास निघालो, तोच “मिशो”ला सोबत घेवून जावू असा विचार आला, (“मिशो” माझ्या कुत्र्याचं नाव) आणि त्यालाही बाइकवर बसवला. वैभवच्या घरी पोचलो तर तो तयारच होता, दोघेही मग थेट शिरवलच्या दिशेने निघालो.
यदरम्यान वैभवने कोलझर येथील त्याच्या एका मित्राला कॉल केला होता, त्यामुळे कोलझर येथील त्याचा मित्र सुमित बोंद्रे आणि त्याच्या सोबत त्याचे तिघे मित्र, आम्हाला कंपनी म्हणून सोबत येणार होते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं होतं ती वाट जंगलातून जाणारी असल्याने आम्हाला ते ठिकाण शोधावं लागलं असतं. ते आता सुमित आणि त्याच्या मित्रांना माहित असल्याने शोधमोहिमेचा सर्व त्रास वाचणार होता. कोलझर मध्ये पोहोचताच सुमित आणि त्याच्या मित्रांसोबत आम्ही इच्छित स्थळी जाण्यास निघालो. पुढे जाताना वाट ओळखिची वाटू लागली याचं कारण म्हणजे २०१९ मध्ये मी आणि माझा मित्र कृष्णा पास्ते आमच्या एका कामासाठी अशाच नैसर्गिक ठिकाणांचा शोध घेत असतेवेळी इथे असणाऱ्या नदीखोल या ठिकाणास भेट देवून गेलो होतो. पण तेव्हा आजच्या इच्छित स्थळी पोचता आलं नव्हतं. नदीखोल म्हणून ज्ञात असलेलं ते ठिकाण आणि आजचे रांजण खळगे ही दोन्ही ठिकाणं एकाच नदीच्या पात्राचा भाग आहेत. नदिखोलच्या बराच पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी आमच्या बाइक थांबल्या. शिरवल मुख्य रस्त्यापासुन इथपर्यंतची संपूर्ण वाट ही ऑफरोड आहे. पूर्वी तिही नव्हती, पण अलिकडे इथल्या काजू बागायतदारांनी केलेल्या कच्च्या रस्त्यांमुळे इथपर्यंत येण्याचा मार्ग खूपच सुखकर बनला आहे. वाट कच्च्या रस्त्याची, चढा-उताराची, खडकाळ, डोंगराळ भागातील असल्याने, आणि बाईक वर मागे वैभव आणि पुढे "मिशो” असल्याने थोडी कसरतच करावी लागली. बाइक पार्क करुन तिथुन थोडं पुढे चालत गेल्यावर नदीचं पात्र लागलं, नदीच्या पात्रातूनच कडेने वरच्या दिशेने चालत गेल्यावर आम्ही पोहोचलो ते, रांजण खळगे असलेल्या त्या विलोभनिय अशा स्वर्गिय ठिकाणी.
नदीपात्र बनवण्यासाठीची निसर्गाची किमया अभूतपूर्व अशीच होती. क्षणाचाही विलंब न दवडता त्या रांजण खळग्याकडे धाव घ्यावी आणि पाण्यात उडी मारावी असेच वाटत होते, पण मी इथे प्रथमच आलो होतो, आणि इथल्या पाण्याच्या खोलीचा कोणताच अंदाज नसल्याने मनात आलेली घाई जाणिवपूर्वक टाळली. सुमित आणि त्याच्या मित्रांपाठोपाठ पाण्याकडे निघालो, पाण्यात थेट उडी न मारता थोडा अंदाज घेऊन पाण्यात उतरलो, थोडा पोहण्याचा आनंद घेतल्यावर मग मात्र उडया मारण्याचा मोह आवरता आला नाही. मिशोलाही पाण्यात ढकलून पोहायला लावले.
याठिकाणची नैसर्गिक समृद्धता, सौंदर्यता पाहिली तर ती निसर्गाची अदभुत अशी किमयागारीच होती, पण नेहमीच मानवी हस्तक्षेपामुळे मात्र निसर्गाच्या सामर्थ्याला खाली आणण्याचे काम केले जाते, तसेच चित्र इथेही पहायला मिळाले. प्लास्टिक कचरा, दारुच्या बाटल्या इतस्ततः फेकून नैसर्गिक सौंदर्याला विद्रुप करण्याचे काम इथे येणारया काही पर्यटकांकडून घडत असते.
सुमितच्या आग्रहाखातर जेवणासाठी त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्याही घरी मिशो सारखेच दोघेजण होते, त्यामुळे सगळ्यांना बांधून ठेवावं लागलं. हात पाय धुवून घरात टिव्ही पाहत बसलो, अमिर खानचा पिके चित्रपट चालू होता. डोक्यावर गरगरणारा पंखा शरीराला थंडावा देण्याचं काम करत होता. थोड्या वेळाने दोन ताटं आमच्या पुढ्यात आली. फ्राय केलेला मासा, गावठी कोंबडीच्या अंड्याची आमटी, निर फणसाची रवा लावुन भाजलेली कापे आणि भात अशा स्वरुपात आलेली ती ताटं बघून आता भुकेची जाणिव तिव्र भासू लागली, मग काय समोर आलेल्या त्या अन्नावर ताव मारण्याचे कार्य शिघ्रतेने सुरु झाले. थोड्या वेळाने आंब्याच्या स्लाइसने भरलेलं एक ताट आलं आणि जेवणाची रंगत अजूनच वाढवण्याचं काम करू लागलं. पोहण्याच्या व्यायामाने दमलेल्या, भुकेल्या शरीराला सुमितच्या घरचा पाहुणचार मिळताच मन तृप्त होवून गेलं. विशेष म्हणजे बाजारची अंडी खायची सवय असलेल्या जिभेला त्या गावठी कोंबडीच्या अंड्याची चव खुपच ऑथेंटिक वाटली. मिशोलाही त्याचा पाहुणचार मिळाला होता.
दरम्यान सुमितचे बाबा शिरवलच्या नदी बद्द्लच्या त्यांच्या आठवणी सांगत होते. सुमितचं घर थोडं कोकणी जून्या धाटणीचं आहे, आणि सभोवताली मोठी झाडे आहेत, अशा नैसर्गिक वतावरणातील घरं मला खुप आवडतात. त्यामुळे जेवण झाल्यानंतर समोर चालू असलेला टिव्ही पाहत बसलेलो असताना घरी जायचा विसर पडलेल्या मला, वैभवला घरी जायची जाग करुन द्यावी लागली. निघताना सुमितच्या बाबांनी प्रथमताच त्यांच्या घरी दाखल झालेल्या मला खुपच आपुलकिने त्यांचे घर दाखवले, आणि पुनश्च येण्याचा अग्रहही केला.
सुमितच्या घरच्यांचा निरोप घेवून मग मिशोला बाइकवर बसवून मी आणि वैभव घरच्या दिशेने निघालो.
1 Comments
आम्हाला पण बोलवा कधीतरी👍
ReplyDelete